छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने एका नक्षलवाद्याचा खात्मा केला. चकमकीदरम्यान झालेल्या आईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. सुकमा-दंतेवाडा आंतरजिल्हा सीमेवरील जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक आणि माओवाद्यांमध्ये गोळीबार झाला.

सुकमा-दंतेवाडा आंतरजिल्हा सीमेवरील जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी विशेष कार्य दल (एसटीएफ), जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या पथकाने कारवाई सुरू केल्याचे सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितले.

चकमकीच्या ठिकाणी शोध घेत असताना जवानांना एका नक्षलवाद्याचा मृतदेह आणि त्याच्यासोबत शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा सापडला. ऑपरेशन दरम्यान झालेल्या प्रेशर आयईडी स्फोटात डीआरजीचे तीन जवान जखमी झाले. तिन्ही जखमी जवानांना उपचारांसाठी मेडिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. शोधमोहिम अद्याप सुरू आहे.