
ऑनलाइन डेटिंगमुळे सध्याच्या घडीला अनेक तरुणी या कॉस्मेटिक सर्जरी करण्यास प्रवृत्त होत आहेत, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. डेटिंग अॅप्स तरुणींवर प्रभाव टाकत असल्याचे एका संशोधनात दिसून आले आहे. यातील प्रमुख बाब म्हणजे डेटिंग अॅप्समुळे आता पूर्वीपेक्षा सहजपणे पार्टनरची निवड करता येऊ लागली आहे. परंतु ही निवड करताना तुम्ही प्रथमदर्शनी सुंदर आणि आकर्षक दिसणेही तितकेच गरजेचे मानले जात आहे. त्यामुळेच तरुणींचा कल हा सर्जरी करण्याकडे वाढू लागला आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने केलेल्या आणि कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की डेटिंग अॅप्सवर सक्रिय असलेल्या तरुणींमध्ये इतर महिलांच्या तुलनेत कॉस्मेटिक सर्जरीचा विचार सर्वाधिक होत आहे.
डेटिंग अॅप्सवर खासकरून तुम्ही कसे दिसता यावरच अनेक गोष्टी अवलंबून असता. या माध्यमांवर आपण सुंदर दिसावे यासाठी अनेकींचा कल हा सर्जरीकडे वळत आहे. संशोधनातून असेही दिसून आले आहे की, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे स्वरुप पाहता डेटिंगसाठी आपल्या सौंदर्यावर लक्ष केंद्रीत करणे हे खूप गरजेचे झालेले आहे.
सध्याच्या घडीला जवळपास प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चेहरा सुंदर करणारे विविध फिलर्स दिसून येतात. यामुळे अधिकाधिक तरुणी लूक बदलण्यासाठी या फिलर्सचा वापर करताना दिसतात. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सेल्फी पोस्ट केल्याने, तरुणींच्या मानसिक वर्तनावरही बहुतांशी परीणाम होतो. म्हणूनच फक्त सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करण्याकडे त्या वळताना दिसत आहेत.
सुंदर दिसण्याच्या वेडापायी तरुणी सुरकुत्या पडू नयेत याकरता इंजेक्शन्स, राइनोप्लास्टी, लिपोसक्शन आणि डर्मा फिलर्स सारख्या चेहऱ्यावरील कॉस्मेटिक सर्जरी करवुन घेत आहेत. जोडीदारावर छाप पाडण्यासाठी जे काही करता येईल त्याकरता तरुणी आता करु लागल्या आहेत.






























































