
शिवसेनेच्या प्रयत्नाने गोराई येथे उभे राहिलेले हिंदुस्थानातील पहिलेवहिले मॅन्ग्रोव्ह पार्क लवकरात लवकर जनतेसाठी खुले करा,’ अशी आग्रही मागणी युवासेनेने आज वनसंरक्षक अधिकाऱयांकडे केली. वनसंरक्षक अधिकाऱयांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
गोराईतील मॅन्ग्रोव्ह पार्क हे मुंबईतील अनोखे पार्क आहे. या पार्कमुळे सागरी वारे व वादळांसह अन्य नैसर्गिक आपत्तींपासून निसर्गाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर, पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पार्कचे काम पूर्ण झाल्यानंतरही गेल्या सहा महिन्यांपासून ते नागरिकांसाठी बंद होते. ते तातडीने सुरू व्हावे यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक अधिकारी रामाराव (मॅन्ग्रोव्ह सेल) यांची सोमवारी त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
‘पर्यावरण संरक्षण व मॅन्ग्रोव्ह संवर्धनाच्या दृष्टीने हे उद्यान महत्त्वाचे आहेच; पण ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांच्या विरंगुळय़ासाठीदेखील ते सुरू व्हायला हवे, असे म्हणणे शिष्टमंडळाने मांडले. तसेच, या मागणीचे लेखी निवेदनही दिले. रामाराव यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला. या शिष्टमंडळात युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्पे, सिद्धेश शिंदे, उपसचिव रणजित कदम, विस्तारक बाळा लोकरे, वरद सावंत आणि विजय बारोट आदी उपस्थित होते.






























































