
हिंदुस्थानला युद्धासाठी उचकवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार होताना दिसत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. मात्र पाकिस्तानने हिंदुस्थानच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ड्रोनच्या सहाय्याने हे हल्ले करण्यात येत आहेत.
हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील पाकिस्तानलगतच्या सीमाभागातील गावांवर हल्ले करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे. या भागात अनेक पाकिस्तानी ड्रोन पाठवण्यात आले, ज्यामध्ये कच्छजवळ हिंदुस्थानच्या हवाई दलाने सहा ड्रोन पाडले. अब्दासाहजवळील क्षेपणास्त्र हल्लाही हाणून पाडण्यात आला. पाकिस्तान सीमेपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिपूर शहरात पाडलेल्या ड्रोनचे अवशेष सापडले आहेत. हिंदुस्थानी सैन्याच्या अत्यंत चोख कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर हानी टाळत्यात आली असून पाकिस्तानचे मनसूबे उधळवून लावण्यात हिंदुस्थानला यश आले आहे.
या भागात कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही. स्थानिक रहिवाशांनी सकाळी 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास ड्रोन पाडताना पाहिले आणि त्यासोबत मोठा स्फोट झाला अशी माहिती इंडिया टुडेच्या संकेत स्थळावरून देण्यात आली आहे.