Operation Sindoor – पाकिस्तानातील अमेरिकन नागरिक आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना सरकारने दिले देश सोडण्याचे निर्देश

american airline

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारने पाकिस्तानात असलेले नागरिक आणि दूतावासातील अधिकारी वर्ग यांना तातडीने पाकिस्तान सोडण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला अजून अधिकृत दूजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, अमेरिकन सरकारच्या संकेत स्थळावर स्टेट डिपार्टमेंटचे एक पत्रक आहे. ज्यामध्ये अमेरिकन सरकार दोन्ही देशातील परिस्थितीवर आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत, असे म्हटले आहे.

आज सकाळच्या या पत्रकात इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावास आणि कराची, लाहोर आणि पेशावरमधील वाणिज्य दूतावास नियमित कामकाजासाठी खुले आहेत असे म्हटले होते.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अमेरिकन नागरिकांना युद्धाच्या संभाव्यतेमुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सीमा आणि नियंत्रण रेषेजवळील ठिकाणांवर प्रवास करू नका असा सल्ला दिला आहे. तसेच पाकिस्तानात ‘प्रवासाचा पुनर्विचार करा’, असा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे.

अमेरिकन नागरिक प्रत्यक्ष युद्धाच्या क्षेत्रात असतील तर, त्यांनी सुरक्षित स्थळी निघून जावे. तसे शक्य नसल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानची अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची उपलब्धता अद्यापही कमी आहे. काही नागरी उड्डाणे रात्रभर चालत असल्याचे वृत्त आहे. आज सकाळी, पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने कराची, लाहोर आणि सियालकोटमधील उड्डाण ऑपरेशन्स तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली होती. अमेरिकन नागरिक प्रवासी त्यांच्या एअरलाइन्ससह किंवा विमानतळ लिंक्सवर फ्लाइटची स्थिती तपासू शकतात असे म्हणून काही संकेतस्थळांच्या लिंक देण्यात आल्या आहेत.