आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी शपथ घेतली नाही

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सरकारने ईव्हीएम मशीनमध्ये गौडबंगाल करून विजय मिळवल्याचा आरोप करीत आज विरोधकांनी आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला. मतांची चोरी करणाऱ्या भाजप, मिंधे आणि अजित पवार गट यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महायुती सरकारचा निषेध केला. सोलापूरच्या मारकडवाडीत दाखल केलेल्या गुन्ह्यांचाही यावेळी विरोधकांनी समाचार घेत ‘लोकशाही झिंदाबाद’, आय लव्ह मारकडवाडी’ असे फलकच झळकवले.

विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विधानसभेचे कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झाले. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राज्यपालांकडून आलेला आदेश वाचून दाखवल्यानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली.

सुरुवातीला कालिदास कोळंबकर यांनी तालिका अध्यक्ष म्हणून चैनसुख संचेती, जयकुमार रावल, आशीष जयस्वाल, माणिकराव कोकाटे यांची निवड जाहीर झाल्यानंतर या चार जणांना सर्वप्रथम विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव शपथ घेण्यासाठी पुकारल्यानंतर आघाडीचे सर्व आमदार उठून सभागृहाच्या बाहेर गेले. विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार घालत सभात्याग केला आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले. महायुतीच्या 173 आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.

सभात्याग केल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून ईव्हीएमविरोधी बॅनर फडकवले. मारकडवाडीतील लोकांनी चाचणी मतदान मागितले तेव्हा ते होऊ दिले नाही. त्यामुळे आम्ही जनतेचा मान राखून आज शपथ घेणार नाही. उद्या आम्ही शपथ घेणार आहोत, असे शिवसेना नेते, आमदार व शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशी जनतेची भावना आहे. हे सरकार जनतेच्या मताचे वाटत नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. त्यामुळे जनभावनेचा आदर करत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

ईव्हीएमच्या पाशवी बहुमतावर सरकार

ईव्हीएमच्या पाशवी बहुमतावर हे सरकार सत्तेत आले आहे. जनतेचा त्याला जनाधार मिळालेला नाही. सत्ता मिळविण्यासाठी अशा प्रकारे संख्याबळ मिळवू लागले तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल. ते टिकवायचे असेल तर लोकशाही मार्गाने निषेध आंदोलन झाले पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यावर बाहेर पडलो. हा शपथविधीचा निषेध नसून काळबेरे केलेल्या सरकारचा निषेध असल्याचे शिवसेना गटनेते भास्कर जाधव विधान भवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना सांगितले.

स्वातंत्र्याचा दुसरा अध्याय

महात्मा गांधी यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी मारकडवाडी तेथील ग्रामस्थांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन पुकारले; परंतु सरकारने जोरजबरदस्तीने ते थांबवले. त्यांचा नक्की काय गुन्हा होता, की त्यांना अटक करण्यात आली. सरकार घाबरल्याने कारवाई झाली. सामान्य माणसांना घाबरवून, दरडावून राज्य करता येणार नाही. दांडीयात्रेने सामान्य माणसाने राज्य पलटवले होते. आता मारकडवाडीचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे. सरकारच्या या एकाधिकारशाहीविरोधात स्वातंत्र्याचा हा दुसरा अध्याय सुरू झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अबू आझमी, निकोले यांनी घेतली शपथ

समाजवादी पक्षाच्या अबू आझमी, रईस शेख आणि माकपच्या विनोद निकोले यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली; मात्र आपण महाविकास आघाडीपासून दूर गेलो नसल्याचे अबू आझमी यांनी स्पष्ट केले.

शपथ संस्कृतमधून

भाजपच्या गिरीश महाजन, सीमा हिरे, प्रशांत ठाकूर, सुधीर गाडगीळ, प्रताप अडसड, राम कदम यांनी संस्कृतमधून, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, एमआयएमच्या मुफ्ती महम्मद इस्माईल यांनी हिंदीतून, तर भाजपच्या कुमार आयलानी यांनी सिंधीतून शपथ घेतली. काही आमदारांनी शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे स्मरण केले.

मारकडवाडीत गुन्हे

मारकडवाडीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आमदार शपथ घेणार नाहीत असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढेन – उत्तम जानकर

ईव्हीएमच्या विरोधासाठी शरद पवार उद्या मारकडवाडी येथे येणार आहेत. माझ्याविरोधात पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि मी मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आग्रही आहोत. निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याची परवानगी दिली. तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढण्यास तयार आहे, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.

6 डिसेंबर 2029 पर्यंत विधानसभा

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 14 व्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 संपुष्टात आली. 7 डिसेंबरपासून 15व्या विधानसभेचा कार्यकाळ सुरू झाला आहे. आता पाच वर्षांचा कालावधी उलटल्यावर 6 डिसेंबर 2029 रोजी या विधानसभेची मुदत संपेल.

भाजपचे हेमंत रासने विरोधकांच्या बाकांवर

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे हेमंत रासने आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोंधळले आणि सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसण्याऐवजी ते विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले. उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यावर व्यासपीठावरून खाली उतरत असताना हेमंत रासने विरोधकांच्या बाकांवर बसल्याचे लक्षात येताच अजित पवार यांनी रासने यांना हाताला धरून उठवले आणि सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर नेऊन बसवले.

सोलापूर जिह्यातील मारकडवाडी नावाचे जे गाव आहे तिथे स्थानिक जनतेने ‘मॉकपोल’ मागितला होता. त्याची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सर्व निवडणुकीनंतर मागितले होते. जिंकलेल्या उमेदवारांनीही पाठिंबा दिला होता. हा ‘मॉकपोल’ जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तर देणारे होते. साधारणपणे मतपत्रिकेवर कोणी किती जिंकू शकते आणि ईव्हीएमवर कोण कसे जिंकू शकते हे आम्ही अनेकदा दाखवले आहे. मध्यंतरीच्या काळात पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएममधील मतांची तफावतही दाखवून दिली होती. आता मारकडवाडीत संचारबंदी लावली तर वीस जणांना अटकही झाली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो आहोत. त्यामुळे आमच्या मनात ईव्हीएमबाबत जी शंका निर्माण झाली आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. निवडणूक आयोगाबद्दल आम्हाला जी शंका आहे ती आम्ही व्यक्त करीत आहोत. आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेतली नाही. लोकशाहीच्या मोर्चापासून सुरुवात होणार आहे.

500 रुपये दंड होऊ शकतो

नवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर विधानसभा सदस्याला सभागृहात शपथ घ्यावीच लागते. सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात 9 डिसेंबरपर्यंत कोणत्याही सदस्याला शपथ घेता येईल. मात्र त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत शपथ न घेतल्यास आणि कामकाजात सहभागी झाल्यास त्या आमदाराला प्रतिदिन 500 रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद घटनेत आहे.

आय लव्ह मारकडवाडी

विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘लोकशाही झिंदाबाद, आय लव्ह मारकडवाडी’ असा बॅनर झळकवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, अजय चौधरी, संजय पोतनीस, वरुण सरदेसाई यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.