
गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर आला असल्यामुळे मोठ्या मंडळांच्या भव्य मूर्ती मंडपाकडे निघाल्या असल्या तरी रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे मंडळांकडून पालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाआधीच रसत खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व 27 वॉर्डमधील सब इंजिनीयरनी रस्त्यावर उतरून दररोज किमान 10 किमी रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवण्याचे काम करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे पालिकेकडे दररोज खड्ड्यांबाबत शेकडो तक्रारी येत आहेत. यामध्ये गणेशमूर्ती बनणाऱ्या लालबाग-परळ विभागातील खड्ड्यांचा प्रश्न सर्वाधिक ऐरणीवर आला आहे. शिवाय गणेशमूर्ती आगमन मार्गात काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही आहेत. याचा फटका मंडपाकडे निघालेल्या मूर्तींना बसत असल्यामुळे मंडळांकडून पालिका प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन खड्डेमुक्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर
रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता जास्तीत जास्त मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये केवळ खड्डा न बुजवता संपूर्ण रस्त्याची सरफेस मास्टिक पद्धतीने दुरुस्ती करण्यात येईल.
मास्टिक डांबरीकरणात 180 ते 200 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असते. ते सर्वात जलद गतीने स्थिर होते. त्यामुळे कोल्डमिस्कऐवजी मास्टिक अस्फाल्टचा वापर करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
…तर सबइंजिनीयरना नोटीस
मुंबईत पालिकेच्या अंतर्गत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते टिकाऊ होण्यासाठी सिमेंट- काँक्रीटचे बनवण्यात येत आहे. या रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येते. मात्र काही वेळा कंत्राटदाराकडून निकृष्ट काम केले जात असल्यामुळे रस्ते लवकर खराब होत आहेत. तर आता रस्त्यांवर खड्डे पडल्यास सब इंजिनीयरना नोटीस बजावण्यात येत असून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे.