
2025 हे वर्ष आयटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धोक्याचे ठरले आहे. जगभरातील 218 आयटी कंपन्यांनी वर्षभरात 1 लाख 12 हजार 732 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. या कंपन्यांमध्ये अॅमेझॉन, टीसीएस, इंटेल, मेटा, मायक्रोसॉफ्ट या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. कर्मचारी कपातीचा डेटा देणाऱ्या लेऑफ या प्लॅटफॉर्मवर ही माहिती देण्यात आली आहे. अॅमेझॉनने 30 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अॅमेझॉनने ऑक्टोबर महिन्यात 14 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू दिला आहे. कॉम्प्युटर बनवणाऱ्या एचपीने सहा हजार कर्मचाऱयांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टने वर्षभरात नऊ हजार कर्मचाऱयांना काढले आहे. ज्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे, त्यातील बहुतांश कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी ही नोकरकपात केली आहे. आगामी काळातही ही कर्मचारी कपात सुरूच ठेवली जाईल, असे अनेक कंपन्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गावर नोकरकपातीची टांगती तलवार कायम आहे.

























































