वेबसीरिज – गुंतवून ठेवणारी रहस्य मालिका

>> तरंग वैद्य

पोलीस तपासकथेवर आधारित ही वेब सीरिज सशक्त कथा आणि जयदीप अहलावत या अभिनेत्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय ठरली. रहस्याच्या शोधकार्यात वेगवेगळ्या वळणांवर बदलत जाणाऱया कथानकात प्रेक्षक गुंतून राहतो हेच या मालिकेच्या यशाचे रहस्य आहे.

पाताल लोक’ नावातच एक वेगळेपण आहे तसेच ‘पाताल लोक’ नावाच्या वेब सीरिजमध्येही. पोलीस तपास कथेवर आधारित ही वेब सीरिज 15 मे 2020 रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आली. सशक्त कथा आणि जयदीप अहलावत या गुणी अभिनेत्याच्या अभिनयाच्या जोरावर खूप गाजली.

चार युवक एका हॉटेलमधून गाडीतून निघतात. पोलिसांच्या गाडय़ा त्यांचा पाठलाग करतात आणि एका पुलावर त्यांचा गाडीला अडवून त्यांना जेरबंद करतात. योगायोगाने तिथे मीडियाची ओबी व्हॅन असते आणि संपूर्ण नाटय़ चित्रित केले जाते. अगदी त्या चारमधला एकजण त्याच्या जवळचा पिवळा मोबाइल नदीत भिरकावून देतो हेसुद्धा चित्रित होते. आता हे चौघे कुठे जात होते, यांचा उद्देश काय होता, त्या फोनमध्ये असे काय गुपित दडले होते याचा शोध लावण्यासाठी हा तपास ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या दिल्ली आउटरच्या अशा अधिकाऱयाला सोपवण्यात येतो, ज्याला असल्या तपासाचा अजिबात अनुभव नसतो. या अधिकाऱयाचे नाव असते हाथीराम चौधरी अर्थात जयदीप अहलावत, जो मिळालेल्या संधीचे सोने करायचे असे ठरवून कामाला लागतो.

मिळालेल्या माहितीद्वारे समजते की एक मोठय़ा न्यूज चॅनलचा मुख्य चेहरा असणाऱया संजीव मेहराला मारण्याचा कट असतो. मेहराची चौकशी होते, पण तो पोलिसांना योग्य असे सहकार्य करत नाही. उलट मिळालेली माहिती आपल्या चॅनलवर ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवून टीआरपी वाढवून स्वतची जागा भक्कम करण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्यामुळे पोलिसांचे काम कठीण होऊन बसते आणि तपासादरम्यानची काही गुपिते उघड झाल्यामुळे पोलीस खात्यावर ठपका येतो. हाथीरामला नोकरीतून निलंबित करण्यात येते आणि केस सीबीआयकडे सोपवली जाते.

हाथीराम आणि त्याचा सहकारी अन्सारी प्रशासनाच्या या निर्णयामुळे दुःखी होतात. निलंबन म्हणजे आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ही भावना हाथीरामला आतून खात असते. सीबीआय गतीने हालचाल करून या कटाच्या मागे अतिरेकी गटाचा हात, पाकिस्तान, नेपाळची भूमिका दाखवत त्या चौघांना अतिरेकी ठरवून जनतेसमोर केस सोडवली असे सांगत आपली पाठ थोपटवून घेतात. ही बाब हाथीराम आणि अन्सारीला पचनी पडत नाही. कारण त्यांच्या तपासाच्या वेळेस त्यांना असे काहीच आढळले नसते आणि हत्येचा हेतू वेगळाच असून यामागे वेगळीच लोक आहेत हे त्यांच्यासाठी पाण्यासारखे पारदर्शक असते. हाथीराम ठरवतो की त्या चौघांनी गुन्हा केलाय. त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. पण अतिरेकी हा ठपका त्याच्यावर नसला पाहिजे आणि त्यासाठी तो पुढे सरसावतो. यात हाथीराम यशस्वी होतो का नाही, खरे गुन्हेगार कोण आहेत याचा शोध घेत ‘पाताल लोक’ची कथा पुढे सरकते.

शोधकार्यात वेगवेगळ्या वळणांवर बरेच काही घडते ज्यामुळे प्रेक्षक गुंतून राहतो हे मालिकेच्या यशाचे रहस्य आहे. अभिनयाबद्दल बोलायचे तर जयदीप अहलावत अभिनय सम्राटाप्रमाणे वावरलाय. नीरज काबी संजीव मेहराच्या भूमिकेत शोभतो. हाथीरामचा सहकारी म्हणून इश्वाक सिंग भाव खाऊन जातो. अभिषेक बॅनर्जीला या मालिकेचा खूप फायदा झाला. त्याने रंगवलेला ‘हथोडा त्यागी’ खूप गाजला. बाकी विपीन शर्मा, आसिफ बसरा, राजेश शर्मा आपापल्या भूमिकेत योग्य. गुल पनागने हाथीरामच्या बायकोच्या भूमिकेला न्याय दिला आहे. स्वस्तिका मुखर्जी मेहराच्या पत्नीच्या भूमिकेत आहे आणि उत्तम असे त्यांचे काम आहे. हे नऊ एपिसोड चुकवू नयेत असेच आहेत. त्यामुळे नक्कीच बघा.

[email protected]

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)