‘समुद्राची राणी’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या खेळाडूचं घर चोरट्यांनी फोडलं, पद्मश्री आणि राष्ट्रपती पुरस्कारांसह अनेक पदके केली लंपास

देशासाठी खेळून पदके जिंकण्याच स्वप्न उराशी बाळगून कष्ट करणाऱ्यांची संख्या देशात मोठ्या संख्येने आहे. परंतु ठरावीक खेळाडूंनाच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा डंका वाजवण्यात यश येत. मेहनत आणि कष्टाच्या जोरावर हे खेळाडू देशासाठी पदके जिंकतात. मात्र, कष्टाने जिंकलेली ही पदके त्यांच्याच घरात सुरक्षीत नाहीयेत. हिंदुस्थानची जलतरणपटू आणि ‘Queen Of Sea’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुला चौधरी यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या चोरीत बुला चौधरी यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके चोरांनी लंपास केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील हुगली येथील देबाइपुकुर, हिंदमोटर परिसरात जलतरणपटू बुला चौधरी यांच वडिलोपार्जित घर आहे. याच घरामध्ये चोरांनी मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला आणि घरगुती वस्तू चोरून नेल्या यामध्ये सर्व पुरस्कारांसह, पुस्तके आणि बाथरुममधील बेसिनच्या नळांचा सुद्धा समावेश आहे. तसेच चोरांनी घरातील सामानाच प्रचंड नुकसान केलं आहे. चोरी झालेल्या घराची देखरेख बुला चौधरी यांचे भाऊ डोलन चौधरी करतात आणि बुला चौधरी या सध्या कुटुंबासह कोलकातामध्ये वास्तव्याला आहेत. TOI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

डोलन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरामध्ये यापूर्वी तीन वेळा चोरी झालेली आहे. पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रारही केली असून अद्याप चोर पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. याठिकाणी पूर्वी एक पोलीस चौकी होती, जी आता काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या चोरीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कारण पूर्वी झालेल्या चोऱ्यांमधील गुन्हेगार अजूनही मोकाटच आहेत. या घटनेमुळे बुला चौधरी यांना जबर धक्का बसला आहे. त्यांनी आपली खंत सुद्धा बोलून दाखवली. “आमच्या घरी इतक्या वेळा चोरी होत असेल, तर सामान्य लोक सुरक्षित कसे राहणार?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.