
पाकिस्तान पुरस्कृत हॅकर्सनी गुरुवारी हिंदुस्थानच्या वेबसाइट्स हॅक करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. सातत्याने होणाऱ्या या सायबर हल्ल्यांना हिंदुस्थानी सायबर सुरक्षा एजन्सींनी त्वरीत रोखून त्यांचे ‘नापाक’ मनसूबे उधळून लावले.
एका प्रयत्नात ‘सायबर ग्रुप HOAX1337’ आणि ‘नॅशनल सायबर क्रू’ या हॅकर गटांनी जम्मूमधील आर्मी पब्लिक स्कूल्सच्या वेबसाइट्सना लक्ष्य केले आणि अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांची खिल्ली उडवणाऱ्या संदेश पोस्ट करून त्या वेबसाइट्स बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
तर दुसऱ्या एका सायबर हल्ल्यात माजी सैनिकांसाठी आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या वेबसाइटचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि हिंदुस्थानच्या हवाई दलाच्या माजी सैनिकांच्या वेबसाइट्स देखील लक्ष्य करण्यात आल्या.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लष्कराशी संबंधित डोमेनच्या पलीकडे, पाकिस्तान-आधारित हॅकर्सनी वारंवार मुले, वृद्ध माजी सैनिक आणि नागरिकांशी जोडलेल्या वेबसाइट्समध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने पाकिस्तानसह अनेक देशांमधील हॅकिंग टीम्सकडून हिंदुस्थानच्या प्रणालींवर 10 लाखांहून अधिक सायबर हल्ले नोंदवले आहेत, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मते, कश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे शोध शाखेने, महाराष्ट्र सायबरने डिजिटल हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण केले आहे.
विश्लेषकांचा असा विश्वास आहे की हे सायबर हल्ले डिजिटल जगात तणाव वाढवण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून केलेल्या मोहिमेचा भाग आहेत. त्यांना पाकिस्तानच्या व्यापक हायब्रिड युद्ध धोरणाचे घटक म्हणून पाहिले जाते, ज्यामध्ये हिदुस्थानविरुद्ध दहशतवाद आणि डेटा युद्धाचा वापर दीर्घकाळापासून सुरू आहे.
पाकिस्तान व्यतिरिक्त, सायबर हल्ले मध्य पूर्व, इंडोनेशिया आणि मोरोक्कोमधून देखील झाले आहेत. अनेक हॅकर गटांनी इस्लामी विचारसरणींशी निष्ठा असल्याचा दावा केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.