Pahalgam Attack च्या 3 दिवस आधीच पंतप्रधानांना मिळाली होती माहिती, म्हणून स्वतःचा दौरा रद्द केला; मल्लिकार्जुन खरगेंच्या दाव्यानं खळबळ

PM had intel 3 days before J&K attack, cancelled own visit Mallikarjun Kharge

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जम्मू-कश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याबद्दल गुप्तचर अहवाल मिळाला होता, त्यानंतर त्यांनी स्वतःचा दौरा रद्द केला. खरगे म्हणाले की 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला होण्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधानांना गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला होता. खरगे यांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

ते पुढे म्हणाले, ‘गुप्तचर यंत्रणेची चूक आहे, सरकारने ते मान्य केले आहे आणि ते त्यावर मार्ग काढतील. जर त्यांना हे माहित असेल तर त्यांनी काहीही का केले नाही?…हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली होती आणि म्हणूनच त्यांनी काश्मीर दौऱ्याचा कार्यक्रम रद्द केला होता, मी हे एका वर्तमानपत्रातही वाचले आहे…’

खरगे असेही म्हणाले की सरकारने कबूल केले की पहलगाममध्ये सुट्टी घालवणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने 26 जणांचा मृत्यू झाला होता हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे.

‘त्यांनी सांगितले की ते त्यात सुधारणा करतील. आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला याबद्दल माहिती मिळाली तेव्हा चांगल्या व्यवस्था का केल्या गेल्या नाहीत?,’ असा सवाल खरगे यांनी विचारला आहे.

24 एप्रिल रोजी झालेल्या बंद दाराआड झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सुरक्षेत त्रुटी असल्याचे मान्य केले, असे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात आले आहे.

विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, सरकारने असे म्हटले आहे की स्थानिक अधिकाऱ्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन परिसर उघडण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली नव्हती. पारंपारिक पद्धतीनुसार जूनमध्ये अमरनाथ यात्रेपर्यंत हा मार्ग संरक्षित केलेला असतो.

पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी, गुप्तचर यंत्रणांनी पर्यटकांना, विशेषतः श्रीनगरच्या बाहेरील झबरवान रेंजच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये राहणाऱ्यांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता, असे पीटीआयने एका जाणकार अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी कटरा ते श्रीनगरला जाणारी पहिली ट्रेन रवाना करण्यासाठी भेट देत असताना दहशतवादी असा हल्ला करू इच्छित होते असे सूचित करणारे संकेत मिळाले होते. तसेच, अधिकाऱ्यांनी सांगितले की 19 एप्रिल रोजी होणारा पंतप्रधानांचा दौरा कटरा परिसरात वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असलेल्या प्रतिकूल हवामान अंदाजामुळे पुढे ढकलण्यात आला होता, असे पीटीआयने म्हटले आहे.