Pahalgam Attack – अशी शिक्षा करा की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही – राहुल गांधी

दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्यासाठी संपूर्ण देश शोकसागरात आहे. यातच आज राहुल गांधी यांनी नरवाल कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर X वर एक पोस्ट करून ते असं म्हणाले आहेत.

X वर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, “पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या शोकाकुल कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. या दुःखाच्या प्रसंगातही त्यांचे धाडस आणि शौर्य राष्ट्रासाठी एक संदेश आहे की, आपल्याला एकजूट राहिले पाहिजे.”

ते म्हणाले आहेत की, “संपूर्ण देश शहीदांच्या कुटुंबियांसोबत उभा आहे. सरकारला विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा आहे. दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही.”