
‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराला भाजपशासित मध्य प्रदेश राज्यात सर्रासपणे केराची टोपली दाखवण्यात येत आहे. मध्य प्रदेशात एकामागोमाग एक भ्रष्टाचार उघडकीस येत असून आता आणखी एक नवीन भ्रष्टाचार समोर आला आहे. मध्य प्रदेशाच्या शहडोल जिह्यात एका सरकारी शाळेची भिंत रंगविण्यासाठी चार लिटर रंगाचा वापर करण्यात आला, परंतु या कामासाठी तब्बल 168 कामगार आणि 65 मिस्त्री कामाला लावण्यात आले होते, असे दाखवण्यात आले आहे. या सर्वांची हजेरी लावून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. पैसे उकळण्यासाठी जे बिल दाखवण्यात आले आहे, ते आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशात भाजपचे सरकार असून प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला जात आहे. शहडोल जिह्यातील एका शाळेची भिंत रंगवण्यासाठी 1 लाख 6 हजार रुपयांचे बिल दाखवण्यात आले आहे. चार लिटर कलरच्या कामासाठी खोटे 168 कामगार दाखवण्यात आले. या बिलाला शिक्षण विभागाच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता तत्काळ मंजुरी दिली. चार लिटर पेंट रंगवण्यासाठी 168 कामगार कसे काय काम करू शकतात, असा सवाल आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.
भाजपशासित राज्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी फुल सिंह मारपाची यांचे धाबे दणाणले असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. शहडोल जिह्यातील सपंदी आणि निपानिया गावातील सरकारी शाळेत हा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. 10 खिडक्या, 4 दरवाजे लावण्यासाठी 275 मजूर, 150 कारागीर दाखवून पैसे मिळवले आहेत.