
पैठण मतदारसंघात भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत लोकशाही धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी दाखल करण्याची वेळ संपून गेल्यावरही भाजपच्या उमेदवारांनी खिडकीतून एबी फॉर्म अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अधिकाऱ्यांवर हे फॉर्म स्वीकारण्यासाठी हरत-हेचा दबाव आणला. या दबावापुढे अधिकाऱ्यांनी नांगी टाकून अर्ज स्वीकारले, पण हुशारीने त्यावर वेळ टाकली. त्यामुळे निवडणूकच पळवण्याचा भाजपचा कुटील डाव उघड झाला आणि छाननीत हे अर्ज बाद झाले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवारी दाखल करण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती. भाजपने जिल्हास्तरावरून पैठणला मिंधे गटाशी युती केल्याचे जाहीर केले होते, परंतु ऐनवेळी भाजपने सर्व गट, गणांतील एबी फॉर्मचे वाटप केले. भाजपने एबी फॉर्म दिले परंतु तोपर्यंत दुपारचे तीन वाजून गेले होते.
उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपल्यामुळे अधिकाऱ्यांनी हे एबी फॉर्म स्वीकारण्यास नकार दिला. निवडणूक हातची जात असल्याचे पाहून भाजप उमेदवारांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी कार्यालयाचा दरवाजा बंद करून घेतला. धक्कादायक म्हणजे उमेदवारांनी खिडकीतून अधिकाऱ्यांवर एबी फॉर्म फेकले.
भाजपच्या नेत्यांनी एबी फॉर्म स्वीकारण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी फॉर्म घेतले, पण त्यावर वेळ नोंदवली. त्यामुळे छाननीत हे सर्व अर्ज बाद झाले.
भाजप उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात घातलेला गोंधळ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि निवडणूकच पळवण्याचा हा कट जगासमोर आला. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार आणि अन्य महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या मंत्र्यांपासून ते फुटकळ कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी फोनवरून धमकावल्याचीही धक्कादायक माहिती आहे.
























































