
एकीकडे आखातात इराण आणि अमेरिका-इस्रायल भिडले असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये देखील जोरदार युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले प्रतिहल्ले असे चित्र गेल्या दोन आठवड्यांपासून पाहायला मिळत आहे. मात्र मंगळवारची पहाट अफगाणिस्तानसाठी भयंकर ठरली. पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर हवाईहल्ला केला आणि हा हल्ला हॉप्सिटलवर करण्यात आला. यात ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५० जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानचे उपप्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी याविषयी माहिती दिली आहे. रात्री ९ च्या सुमारास पाकिस्तानने एका व्यसनमुक्ती हॉस्पिटलवर हल्ले केले. २००० हजार खाटांचे हे मोठे हॉस्पिटल या हल्ल्यात ध्वस्त झाले. उपचार सुरू असलेल्या अनेक रुग्णांचा यात मृत्यू झाला आहे.
तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ‘पाकिस्तानी लष्करी राजवटीने पुन्हा एकदा हवाई हद्दीचे उल्लंघन करून रुग्णालयांवर हल्ले केले आहेत. हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे,’ अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानने हॉस्पिटलवर हल्ला केल्याचे वृत्त नाकारले आहे. या आरोपांना कसलाही आधार नसल्याचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी म्हटले आहे. आपण फक्त तालिबानच्या लष्करी तळांना, दारूगोळ्याच्या साठ्यांना लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे.































































