जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरघोडी आणि सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. अशातच बांगलादेशात सत्तापालटाने अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा अनेक आघाड्यांवर हिंदुस्थानला सामना करावा लागत आहे. आता पाकिस्तानने सीमेवर नापाक हालचाली सुरू केल्या आहेत. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. हिंदुस्थानच्या सैन्याचे प्रमुख सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सध्या संपूर्ण जग एका मोठ्या घातक स्थितीतून जात आहे, असे सीडीएस जनरल चौहान म्हणाले.
हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर पीर पंजाल भागात अचानक तणाव वाढला आहे. बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराने चिंता वाढवली आहे. बांगलादेशात सत्तापालटाची घटना सुरू असताना दुसऱ्या देशांसोबतचा सीमेवरील तणाव कायम आहे, असे सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितले.
#WATCH | Delhi | While speaking at an event – ‘Military Ammunition – Make in India and make for the world’, CDS, General Anil Chauhan says, “When we look around us, we find that the world is in turmoil. The global geopolitical environment is in a state of flux. I believe we are… pic.twitter.com/c1AfeOhbTW
— ANI (@ANI) August 8, 2024
दिल्लीत सैन्याशी संबंधित आयोजित एका कार्यक्रमात सीडीएस चौहान बोलत होते. हिंदुस्तानसमोर सुरक्षेची आव्हाने आहेत. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये प्रॉक्सी वॉर म्हणजे छुपे युद्ध छेडलेले असल्याने पूर्वीपासूनच आपण त्याचा सामना करत आहोत. यात आता अचानक पीर पंजाल रेंजची भर पडली आहे, असे सीडीएस चौहान म्हणाले. तसेच चीनशी दीर्घकाळापासून असलेला सीमावाद अजूनही कायम आहे, असेही सीडीएस चौहान पुढे म्हणाले.
बांगलादेशातील हिंसेचा हिंदुस्थानवर काय झाला परिणाम?
सीडीएस चौहान यांनी यावेळी बांगलादेशातील हिंसाचाराचाही उल्लेख केला. ‘हिंदुस्थान यावेळी दोन प्रमुख आव्हानांचा सामना करत आहे. यात आपल्या शेजारी देशात निर्माण झालेली अस्थिरता ही चिंतेचे कारण ठरली आहे. हिंदुस्थानसारख्या मोठ्या देशाला सुरक्षेसंबंधी अनेक समस्या आहेत. यामुळे हिंदुस्थानला युद्ध शस्त्रास्त्रांसाठी विदेशातील आयातीवर अवलंबून राहून चालणार नाही. खास करून जागतिक सुरक्षा आणि कायम अस्थिर स्थितीचा सामना सरकार करते आहे’, असे सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट केले.