
हिंदुस्थान–पाकिस्तानदरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानी विमानांना स्वतःच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला होता. मात्र हवाई क्षेत्र बंद करून पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाला (पीएए) अवघ्या दोन महिन्यांत 1,240 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा तोटा झाला आहे, अशी माहिती पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिली.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंदुस्थानने सिंधू जल कराराला स्थगिती दिली. हिंदुस्थानच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने हिंदुस्थानी विमानांना त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले. 24 एप्रिलपासून हवाई बंदी लागू केल्यामुळे पाकिस्तानचा महसूल मोठय़ा प्रमाणात बुडाला आहे. 24 एप्रिल ते 30 जूनपर्यंत या बंदीमुळे दररोज 100 ते 150 विमान उड्डाणांवर याचा परिणाम झाला. तसेच पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील वाहतूक जवळ जवळ 20 टक्क्यांनी घटली.
पाकिस्तानी विमानांना हिंदुस्थानात नो एंट्री
पाकिस्तानने हिंदुस्थानी विमानांसाठी हवाई क्षेत्राची बंदी 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असले तरी हिंदुस्थानी विमानांनी इतर आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचा वापर सुरू ठेवला आहे, तर पाकिस्तानच्या विमानांना मात्र अद्यापही हिंदुस्थानचे हवाई क्षेत्र उपलब्ध केलेले नाही. पाकिस्तानच्या विमानांसाठी हवाई क्षेत्र 23 ऑगस्टपर्यंत बंद राहील.