भीक मागण्याची लाज वाटते; मान खाली जाते! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हताश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला सावरताना पंतप्रधान शाहबाज शरीफ हताश झाले आहेत. तशी जाहीर कबुलीच त्यांनी दिली आहे. ‘‘भीक मागायची आता लाज वाटते. मान खाली जाते,’’ असे त्यांनी म्हटले आहे.

इस्लामाबादमध्ये देशातील निर्यातदारांशी बोलताना शुक्रवारी रात्री त्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘‘विदेशी कर्जामुळे पाकिस्तानची फक्त अर्थव्यवस्थाच ढासळलेली नाही, तर सन्मानही आपण गमावून बसलो आहोत. कर्ज घेताना समोरचे लोक जे म्हणतील, त्याला मान हलवावी लागते. कधी कधी नको त्या गोष्टींना होकार द्यावा लागतो.

सेलिब्रेशन करू नका!

देशाची अर्थव्यवस्था आता स्थिर झाल्याचा दावा त्यांनी केला. परकीय चलनाचा साठाही वाढला आहे. मात्र त्याचे सेलिब्रेशन करण्याची गरज नाही. आकडे हे मास्क घालून येत असतात. परकीय चलनाच्या साठय़ात झालेली वाढ ही निर्यातीतील वाढीमुळे किंवा आर्थिक उभारीमुळे झालेली नाही. मित्र देशांनी दिलेल्या कर्जामुळे झाली आहे. त्यामुळे स्थैर्य आल्यासारखे वाटत असेल, पण त्यामुळे अवलंबित्व वाढले आहे,’’ असे शरीफ म्हणाले. ‘‘चीनने आपल्याला सर्वात जास्त मदत केली आहे,’’ असे त्यांनी सांगितले.