पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, हिंदुस्थानी सैन्याला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

युद्धबंदीची घोषणा झाल्याच्या अवघ्या चार तासांच्या आतच पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले, जे हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केले. यातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानंतर हिंदुस्थानी सैन्याला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी आज संध्याकाळी हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये शस्त्रसंधीचा करार झाला. गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या कराराचे उल्लंघन केले जात आहे.”

ते म्हणाले की, “हिंदुस्थानी सैन्य या सीमेवरील घुसखोरीला प्रत्युत्तर देत आहे आणि त्याचा सामना करत आहे. ही घुसखोरी अत्यंत निंदनीय आहे. यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्हाला वाटते की, पाकिस्तानने ही परिस्थिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी.”