
पाकिस्तानात मेन स्ट्रीम मीडियापासून सोशल मीडियावर खोटय़ा दाव्यांचा सुळसुळाट सुरू आहे. बनावट व्हिडीओ आणि फोटोंमधून खोटय़ा बातम्या व्हायरल केल्या जात आहेत. अशा पद्धतीने हिंदुस्थानविरोधात प्रचार करून जगभरातून सहानुभूती मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे.
जिओ न्यूज या वृत्तवाहिनीने हिंदुस्थानचे 25 ते 29 ड्रोन रोखल्याचा दावा केला आहे, तर एआरवाय न्यूजने दावा केलाय की, हिंदुस्थानने हल्ल्यासाठी इस्रायली बनावटीचे ड्रोन वापरले होते. हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांच्या बातम्या पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या नाहीत.
डॉन न्यूजसारख्या काही पाकिस्तानी माध्यमांनी पाकिस्तानने कोणतेही हल्ले केल्याचे किंवा दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे स्पष्टपणे नाकारले. त्याऐवजी त्यांनी जम्मू आणि कश्मीरमध्ये पाकिस्तानी कारवायांच्या बातम्यांना ‘खोटय़ा बातम्या’ म्हटले.