
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी लागू झाल्यानंतर आता हजारो पॅलिस्टिनी नागरिकांनी दक्षिण गाझाहून गाझा शहराकडे परतण्यास सुरुवात केली आहे. 7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझावर जोरदार हल्ला केला. यानंतर उत्तर गाझा रिकामा करण्यात आला होता. या हल्ल्याला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांत गाझा संपूर्ण बदलून गेले असून गाझा शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. तेथे वीज नाही, पाणी नाही आणि पायाभूत सुविधा, शाळा, रुग्णालये शिल्लक राहिली नाहीत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेल्या या युद्धबंदीनुसार हमासने 72 तासांच्या आत जिवंत इस्रायली बंधकांना सोडणे आवश्यक आहे. त्या बदल्यात इस्रायल 250 पॅलेस्टिनी कैदी आणि 1,700 पैद्यांना सोडणार आहे. इस्रायलने 53 टक्के भूभागातून सैन्य मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता दररोज 600 मदत ट्रक गाझामध्ये पोहोचतील. शुक्रवारी युद्धबंदी लागू झाल्यानंतर हजारो लोकांनी पायी गाझा शहरात परतण्यास सुरुवात केली. पॅलेस्टिनी समुद्रकिनाऱ्यावरील रस्त्यांवरून परतत आहेत. लोक दैनंदिन गरजेच्या वस्तू सोबत आणत आहेत.
12 वर्षांनंतर अमेरिकन सैन्यांची तैनाती
गाझामध्ये युद्धबंदी झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेने मर्यादित सैन्य तैनात करण्याची घोषणा केली आहे. 12 वर्षांत पहिल्यांदाच अमेरिका थेट परदेशी संघर्ष क्षेत्रात सैन्य पाठवत आहे. यापूर्वी 2013 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आयसिस दहशतवादी गटाशी लढण्यासाठी सीरियामध्ये मर्यादित संख्येने सैन्य पाठवले होते. या तैनातीसोबत संयुक्त राष्ट्र आणि इजिप्तची पथके असतील. अमेरिकन सैन्याला युद्धबंदीचे निरीक्षण करणे, मदत पुरवठय़ाचे सुरक्षित वितरण करण्यात मदत करणे आणि सुरक्षा प्रदान करण्याचे काम सोपवले जाईल.