
बोगस पटसंख्या दाखवून सरकारचे अनुदान लाटणाऱ्या शाळांना आता चाप बसणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यात खास मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ११ एप्रिलपासून सर्व शाळांमध्ये पटपडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष हजर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि नोंदवहीतील पटसंख्या याची पडताळणी काटेकोरपणे होणार आहे. शिक्षण विभागाने त्यासाठी खास पथके तयार केली असून ही पथके विविध शाळांची अचानक पाहणी करणार आहेत. या मोहिमेमुळे बोगसगिरी करणाऱ्या शाळाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
पालघर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्या २ हजार ५३ प्राथमिक व माध्यमिक शाळा असून त्यात १ लाख ३५ हजार २२० एवढे विद्यार्थी शिकत आहेत. तर खासगी ३११ एवढ्या शाळा असून तेथे १ लाख ९८ हजार ६६४ विद्यार्थी शिकतात. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमपणे वाढवून दाखवण्यात आली. त्याआधारे अनुदानही लाटण्याचा सपाटा सुरू आहे. यासंदर्भातील तक्रारी आल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिक्षणानुसार तीन टप्प्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची शहानिशा करणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पडताळणी मोहिमेत डिजिटल हजेरी प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. रिअल टाईम मॉनिटरिंगद्वारे तपासणी अधिक पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे.
शिक्षकांना दररोज विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच अचानक तपासणीद्वारे प्रत्यक्ष उपस्थितीची खातरजमा केली जाणार आहे.
तपासणीदरम्यान नियमभंग केल्याचे आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यातील शाळांची पटपडताळणी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळानिहाय अचूक नियोजन करून प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद स्टुडंट पोर्टलवर वेळेत करणे अनिवार्य आहे.
अशोक पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

























































