
पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना समोर आली आहे. सेक्टर J-62 मधील एका कंपनीत मंगळवारी LDO (लाईट डिझेल ऑइल)मुळे सकाळी ही आग लागली. ज्वलनशील इंधनामुळे आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. परिसरात धुराचे लोट पसरले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे भीषण स्वरुप पाहता विविध ठिकाणांहून अतिरिक्त पथकेही पाचारण करण्यात आली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या कंपनीत सुमारे दहा कामगार काम करत होते. मात्र प्रसंगावधान राखत वेळीच सर्व कामगारांनी बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, LDO इंधन साठ्यातून ही आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिसर तात्काळ सील केला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.































































