
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांची दर्शनाची आस अधुरीच राहिली आहे. दर्शनाआधी महिला भाविक चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजता घडली आहे. यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एका महिलेचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. या महिला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावातील महिला आल्या होत्या. या महिला शनिवारी सकाळी चंद्रभागा स्नान करण्यासाठी 7 वाजता आल्या होत्या. चंद्रभागेत पुंडलिक मंदिरालगत स्नान करण्यासाठी उतरल्या होत्या. यामध्ये सुनीता माधव सपकाळ (वय 43) आणि संगीता संजय सपकाळ (वय 40) या दोन महिलांसह आणखी एक महिला अशा तिघींना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्या आहेत. या महिला पाण्यात बुडाल्याचे इतर महिलांनी पाहिल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे इतर महिला पाण्यात गेल्या नाहीत. मात्र बुडालेल्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
संगीता संजय सपकाळ व सुनीता माधव सपकाळ या दोन महिलांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या बुडालेल्या महिलेचा शोध सुरू आहे. वास्तविक पाहता पंढरपूर प्रशासनाने चंद्रभागा नदीत आपत्कालीन घटनेसाठी जीवरक्षक एक बोट आणि कर्मचारी दिल्याचा गवगवा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात नदीत कोणतीही आपत्कालीन व्यवस्था नाही.