
कमी पटसंख्येच्या शाळांमुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याच्या शालेय शिक्षण राज्य मंत्री पंकज भोयर यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत शिक्षण क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यातील 17 हजार शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. या शाळांवर आणि वेतनावर होणारा खर्च जनतेच्या खिशातून जातो. त्यामुळे आता जनतेनेच या शाळांचे काय करायचे याचा विचार करायला हवा, असे मत भोयर यांनी नुकतेच नागपूर येथील एका कार्यक्रमात मांडले होते. त्यावर ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, संबंधित मंत्र्यांनी विधाने करताना अधिक जबाबदारीने करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पटसंख्येच्या कारणावरून एकही शाळा बंद केली जाणार नाही असे जाहीर आश्वासन आधीच्या मंत्र्यांनी दिल्याची आठवण जोशी यांनी करून दिली आहे.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याला पालकांचा, शिक्षणतज्ञांचा, शिक्षक संघटनांचा विरोध आहे. मात्र या शाळा सुरू ठेवणे योग्य आहे का, याचा विचार आयकर भरणाऱया नागरिकांनी करावा. शाळा सुधारणे हे फक्त शिक्षकांच्या हाती आहे, असे विधानही भोयर यांनी केले. यावर, ‘गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील करदाते असणारेच शिक्षणाशी, मराठीशी संबंधित कार्य करणाऱया संस्था, संघटना, चळवळी, शिक्षण तज्ञ, अभ्यासक पटसंख्येच्या कारणावरून मराठी माध्यमाच्या शाळा बंद केल्या जाऊ नयेत, याकरिता आंदोलन, चळवळी करत आहेत,’ याची आठवण भालचंद्र जोशी यांनी करून दिली.