
मृत व्यक्तीला जिवंत दाखवून भाजपच्या माजी नगरसेवकाने कामोठे येथील एक हजार १०० चौरस मीटरचा भूखंड हडप केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सिडको व्यवस्थापनाने पनवेलमधील माजी नगरसेवक सुनील बहिरा आणि त्यांच्या कुटुंबीयांसह १२ जणांविरोधात पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक, अपहार आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी बहिरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पनवेलमधील रहिवासी विष्णू बहिरा यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेल्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात सिडकोकडून मिळणाऱ्या भूखंडासाठी बहिरा कुटुंबाने संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली. मृत विष्णू बहिरा यांचे ओळखपत्र बनवून त्यावर मृत व्यक्तीऐवजी सखाराम ढवळे यांचा फोटो लावण्यात आला. ढवळे यांना विष्णू बहिरा असल्याचे भासवून त्यांच्या स्वाक्षऱ्यांद्वारे हा घोटाळा केल्याचे सिडकोने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे.
आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता
सिडकोच्या अखत्यारीतील या मालमत्तेचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मंगळवारी पनवेल शहर पोलि सांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घेवडेकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या गुन्ह्यात आणखी आरोपी सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
1 सिडकोच्या सहाय्यक विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पनवेल तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि सिडकोच्या विविध कार्यालयात २००६ पासून या कागदपत्रांचा वापर करण्यात आला.
2 भाडेपट्टा करारनामा व त्रिपक्षीय करारावेळीही ढवळे हा विष्णू बहिरा म्हणून उपस्थित राहिला होता. या बनवाबनवीमुळे कामोठे येथील सेक्टर ३५ मधील एक हजार १०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड बहिरा कुटुंबाच्या नावावर झाला.




























































