
पनवेलच्या विविध गावांतील प्रदूषणाचा प्रश्न हायकोर्टात पोहोचला आहे. परिसरातील दगड खाणींमुळे वहाळ, उलवे, पडेघर, बांववी पाडा आणि बांववी कोळीवाडा या गावांतील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले असून नागरिकांची प्रचंड घुसमट होत आहे. त्यामुळे तातडीने प्रदूषण रोखण्यासाठी सरकारला ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल झाली आहे.
वहाळ येथील राजेंद्र पाटील यांनी अॅड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेतली. 1983 च्या महाराष्ट्र वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत तरतुदींची काटेकोर अंमलबजावणीची मागणी याचिकेतून केली आहे. प्रदूषणामुळे नागरिकांची घुसमट होत आहे. धूळ घरात येत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना घराच्या खिडक्या बंद करणे भाग पडत आहे, असा दावा याचिकेत केला आहे.