
मंत्रालयातील कारभार पेपरलेस व्हायला अजून काही काळ जावा लागेल. पण आजपासून कागदी बॉण्ड पेपर राज्यात बंद करण्यात आले आहेत. यापुढे ई-बॉण्डवर ऑनलाईन पद्धतीने व्यवहाराची नोंद करता येणार आहे. त्यामुळे आधीच्या बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होणार आहे. कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे.
महसूल विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कागदी बॉण्ड हद्दपार होणार आहेत. त्याजागी इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात झाली आहे. राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड (एनईएलएल) आणि नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर (एनईसी) या संस्थांच्या सहकार्याने कस्टम ई-बॉण्ड प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या नव्या प्रणालीमुळे आयातदार व निर्यातदारांना विविध व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी बॉण्ड देण्याऐवजी एकाच इलेक्ट्रॉनिक बॉण्डद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. आईसगेट पोर्टलवरून ई-बॉण्ड करता येणार आहे. एनईएसएलद्वारे त्यावर डिजिटल स्टॅम्पिंग आणि आधारकार्ड आधारित स्वाक्षरी होईल. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांकडून त्याची ऑनलाईन पडताळणी होईल. या डिजिटल प्रक्रियेमुळे सीमा शुल्क प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.
मुद्रांक शुल्क भरणा ऑनलाईन
मुद्रांक शुल्कासह सर्व शुल्काचे भरणे संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. महाराष्ट्र स्टॅम्प कायद्यानुसार निश्चित केलेले 500 रुपयांचे शुल्क आता ऑनलाईन जमा करता येणार असून कागदी स्टॅम्पची आवश्यकता संपुष्टात येणार आहे.