Parbhani News – जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरून, येलदरी धरणाचे दहाच्या दहा दरवाजे उघडण्यात आले

मघा नक्षत्रातील पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला असून सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण ओसंडून वाहत असून सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी धरणाचे सर्व दहाच्या दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भ मराठवाड्याला जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

पूर्ण पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून सोमवारी दुपारी बारा वाजता सर्वच्या सर्व दहा दरवाजे एक ते दीड मिटरने उघडून पूर्णा नदी पात्रात 53360.53 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून तसेच खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्याने आज सकाळी 7.45 वाजता येलदरी धरणाचे प्रथम सहा आणि नंतर एकूण दहा गेट 0.5 मी. ने उघडण्यात आले आहेत. त्याद्वारे 21100.40 क्यूसेस इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. दुपारी यात वाढ करण्यात आली. तसेच येलदरी जलविद्युत केंद्राच्या गेटद्वारेही 2700 क्यूसेस पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान येलदरी धरणातून सोडण्यात आलेल्या प्रचंड पाण्यामुळे पुर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या सखल भागातील शेतामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तर अनेक ओढ्यांमध्ये नदीचे बॅक वॉटर गेल्यामुळे ग्रामीण भागातील हिवरखेडा, इटोली, सावळी, चिंचखेड आदी भागातील ग्रामीण रस्ते काही काळासाठी बंद पडल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, येलदरी धरणातून सोडण्यात आलेले पाणी पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून शेकडो नागरिक महिला लहान मुले धरणातील पाणी पाहण्यासाठी धरणस्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनास गर्दी पांगवताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वाहने पडली अडकून: येलदरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पुलावरून जवळपास एक मीटर पेक्षा जास्त पाणी जात असल्यामुळे या पुलावरून वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे विदर्भातील अकोला, वाशिम, रिसोड, मालेगाव, अमरावती आदी मोठ्या शहरांकडे जाणारी वाहने येलदरी येथेच अडकून पडली आहेत. शिवाय येलदरी येथे देखील दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे प्रवाशांची खूप मोठी कुचंबना झाली आहे.

जिंतूरचे तहसीलदार राजेश सरवदे, नायब तहसीलदार प्रशांत राखे यांनी येलदरी धरणास भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच पूर नियंत्रणासाठी आवश्यक सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, अमित शिराळकर, बालाजी पुंड दिनेश बेटकर आदींनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मात्र धरण पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्यामुळे पोलिसांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे.