लाडक्या बहिणींना दीड हजार; लेकींना अजूनही फक्त 1 रुपया, 33 वर्षांपासून विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ नाही

राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवल्या जात असताना उपस्थिती भत्त्याच्या बाबतीत मात्र गेल्या 3 दशकांपासून कोणताही बदल झालेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिला लाभार्थींना महिन्याला 1,500 रुपये दिले जात असताना, शालेय विद्यार्थिनींना मिळणारा उपस्थिती भत्ता आजही फक्त 1 रुपयावरच स्थिर आहे. त्यामुळे ही योजना बंद करावी किंवा भत्त्यात लक्षणीय वाढ करावी, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी परिसरातील पालकांकडून जोर धरू लागली आहे.

1992 पासून विद्यार्थिनींसाठी उपस्थिती भत्ता सुरू करण्यात आला. 1 ते 4 पर्यंत शिकणाऱ्या मुलींना दररोज 1 रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्याची तरतूद आहे. मात्र 33 वर्षे उलटूनही या भत्त्यात एक पैसाही वाढ झालेली नाही. रविवारी व सुट्ट्या वगळता वर्षभरात मुलींच्या हाती जेमतेम 200 रुपये पडतात. वाढती महागाई, वह्या-पुस्तकांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि दैनंदिन खर्च पाहता हा भत्ता तुटपुंजा असून त्याचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थिनींना होत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.

“लाडकी बहीण”ला 1,500; विद्यार्थिनींना 1 रुपया – पालकांचा सवाल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत महिलांना महिन्याला 1,500 रुपये मदत दिली जात आहे. मात्र सावित्रीच्या लेकींना आजही फक्त 1 रुपयाचा भत्ता मिळत असल्याने विषमता आणि अन्याय होत असल्याची भावना पालकांतून व्यक्त होत आहे.
“ही योजना बंद करा किंवा भत्त्यात तातडीने मोठी वाढ करा,” अशी मागणी पालकांनी केली आहे.

2 रुपयांची वही आता 50 रुपयांची

1992 मध्ये 2 रुपयांना मिळणारी वही आज 50 रुपयांना पोहोचली आहे. पेनची किंमतही 1 रुपयापेक्षा अधिक झाली आहे; पण उपस्थिती भत्ता तसाच 1 रुपयावर स्थिर आहे.
“33 वर्षांपूर्वीचा तोच भत्ता आजही दिला जात आहे. हा मुलींचा सरळ-सरळ उपहास आहे,” अशी टीका पालकांकडून होत आहे.

भत्त्यात वाढ करण्याची पालकांची मागणी

दरमहा केवळ 22 रुपये मिळाल्याने मुलींना एक वहीदेखील विकत घेता येत नाही. वाढती महागाई लक्षात घेऊन किमान 10 रुपये प्रतिदिन उपस्थिती भत्ता देण्यात यावा, अशी मागणी तोरणा येथील पालकांनी केली आहे.
“लाडकी बहीण असू शकते, मग लाडकी मुलगी का नाही?” असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.