Paris Olympic 2024 : पदकांची हॅटट्रीक हुकली; मनू भाकरचं चौथ्या स्थानावर समाधान

फ्रान्सच्या पॅरिस शहरात सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानची नेमबाज मनू भाकर हिची पदकांची हॅटट्रीक करण्याची संधी हुकली आहे. शनिवारी झालेल्या 25 मीटर एअर पिस्तूल महिला एकेरीच्या फायनलमध्ये मनू भाकरला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र तत्पूर्वी तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात वैयक्तीक आणि मिश्र दुहेरीत कांस्य पदक जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली.

25 मीटर पिस्तूल फायनलमध्ये मनू भाकर एकवेळ दुसऱ्या स्थानावर होती. मात्र त्यानंतर ती सहाव्या स्थानावर फेकली गेली. पुन्हा कमबॅक करत मनू तिसऱ्या स्थानावर आली. 8 फेऱ्यानंतर मनू भाकर आणि हंगेरीची मेजॉर व्हेरॉनिकाचे 28 पॉइंट झाले. त्यानंतर दोघींमध्ये शुट ऑफ झाला. यात मनू कमी पडली आणि तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, या पराभवामुळे मनू भाकर खचली नाही. हा निकाल अंतिम नसून यापुढे आणखी पदकं जिंकायची आहे, असा निर्धार मनू भाकर हिने व्यक्त केला.

दोन कांस्यपदकांवर मोहोर

मनू भाकर हिने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनूने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरीमध्ये सरबज्योत सिंग याच्यासोबत तिने कांस्यपदक जिंकले. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू हिंदुस्थानची पहिली नेमबाज ठरली.