
पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाने अखेर यूईएफए चॅम्पियन्स लीगवर आपले नाव कोरत इतिहास घडविला. शनिवारी म्यूनिख येथील एलियान्झ अरेनामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पीएसजीने इंटर मिलानचा 5-0 गोल फरकाने धुव्वा उडवून ऐतिहासिक कामगिरी केली. कारण पीएसजीचे या चॅम्पियन्स लीगमधील हे पहिलेच विजेतेपद ठरले.
या ऐतिहासिक विजयात तरुण खेळाडू देजिरे डूए याने दोन भन्नाट गोल (20व्या व 63व्या मिनिटाला) करत चमकदार कामगिरी बजावली. तोच या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याचबरोबर अशरफ हकीमी, ख्विचा आणि सेनी मायुलु यांनीही प्रत्येकी एक गोल करत पीएसजीचा विजय सुनिश्चित केला.
‘विजयानंतर पीएसजीचे मुख्य प्रशिक्षक लुइस एनरिक यांनी हा ऐतिहासिक क्षण आपली दिवंगत मुलगी ‘जाना’ हिला समर्पित केला. जानाचा 2019 मध्ये अवघ्या 9 व्या वर्षी हाडाच्या कर्करोगामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता.