Parliament Budget Session 2026 – लोकसभेत विरोधी पक्षातील आठ खासदार अधिवेशनासाठी निलंबित; संसदेत गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी डोकलामचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारची चांगलीच भंबेरी उडाली होती. त्यानंतर संसदेत मंगळवारीही गदारोळ सुरूच होता. विरोधी पक्षांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत अध्यक्षांवर कागदपत्रे फेकली. कागदपत्रे फेकणाऱ्या काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदारासह आठ विरोधी खासदारांचे पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. यानंतर अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी विरोधी खासदारांनी अध्यक्षांवर कागदपत्रे फेकल्याने लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला. या वर्तनानंतर अध्यक्षांनी कठोर कारवाई केली आणि माणिकम टागोर आणि गुरजीत औजला यांच्यासह आठ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निलंबनाविरोधात निदर्शने केली.

लोकसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना विरोधी सदस्यांनी गोंधळ घालत अध्यक्षांच्या खुर्चीवर कागदपत्रे फेकली. त्यानंतर, सभापतींनी कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी ३ वाजता सुरू होताच, पीठासीन अधिकाऱ्यांनी या वर्तनासाठी पेपर फेकणाऱ्या सदस्यांची नावे देण्याचा प्रस्ताव मांडला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उर्वरित अधिवेशनासाठी पेपर फेकणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला, जो सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केला.

लोकसभा अध्यक्षांनी संसदीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माणिकम टागोर, गुरजीत औजला, राजा वारिंगा, हिबी एडन, किरण रेड्डी, प्रशांत पोडोले, वेंकट रमन आणि डीन कुरियाकोसे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले. ठराव मंजूर झाल्यानंतरही, विरोधी सदस्यांनी अध्यक्षांवर कागदपत्रे फेकली. महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांचा आहे. निलंबनानंतर या खासदारांनी संसद संकुलातील गांधी पुतळ्यासमोर निदर्शने सुरू केली आहेत.