
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू असून शुक्रवारी दोन्ही सदनात गदारोळ सुरूच होता. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच गदारोळाला सुरुवात झाली. अनुदानाच्या मागण्यांवरही लोकसभेत चर्चा होणार आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान गोंधळाला सुरुवात झाली. सभागृहात गदारोळ करत टेबलांवर चढत घोषणाबाजी केल्यास कारवाई केली जाईल, असे सभापती ओम बिर्ला यांनी स्पष्टपणे सांगितले. सभागृहाच्या आत आणि बाहेरही सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. दरम्यान, राज्यसभेचे कामकाज सुरू आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे. लोकसभेचे कामकाज सुरू होताच गोंधळ उडाला. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना त्यांच्या जागी परतण्याचे आणि प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की प्रश्नोत्तराच्या तासात आठ विरोधी सदस्यांचे प्रश्न देखील सूचीबद्ध केले गेले होते. मात्र,गदारोळ सुरूच राहिला. त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली.
लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू होताच गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे पुन्हा कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभेत विरोधकांच्या गदारोळात, संध्या राय यांनी अध्यक्षांकडून सभागृहाचे कामकाज सुरू करण्याची विनंती केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही सभागृहाचे कामकाज सुरू करण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही गदारोळ सुरुच राहिल्याने कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, विरोधी सदस्य वेलमध्ये उतरले. त्यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सभागृहात विधेयक मांडण्याची वेळ आहे. त्या काळात तुम्हाला जे मुद्दे उपस्थित करायचे आहेत ते उपस्थित करा. सर्वांनी शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राजद खासदार मनोज झा यांनी राज्यसभेत सार्वजनिक ग्रंथालयांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की आज आपण स्वच्छता मोहिमेवर काम करत आहोत. सामाजिक स्वच्छतेसोबतच आपल्याला मानसिक स्वच्छतेचीही गरज आहे आणि यासाठी ग्रंथालये हे एक प्रमुख माध्यम आहे. ग्रंथालये कुठेतरी हरवली आहेत. पुस्तकांची मैत्री ही सर्वोत्तम आहे. आपण यावर काम केले पाहिजे. पुस्तके तुमच्या एकाकीपणाला कमकुवतपणा मानत नाहीत. पुस्तके फक्त शांतपणे तुमच्या परत येण्याची वाट पाहत असतात. ग्रंथालये मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी आपल्याला केले. जर भारत वाचला तर भारत प्रगती करेल. स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेत आरोग्य विम्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की ऑनलाइन विम्यात एका कंपनीचा मोठा वाटा आहे. ती कंपनी आता रुग्णालयांमध्येही गुंतवणूक करत आहे. तीच कंपनी विमा देत आहे, त्याच कंपनीला दावे भरावे लागतात आणि तीच कंपनी प्रवेशही देईल. यासाठी एक नियामक संस्था असावी.























































