…तर उरलेसुरले प्रवासीही एसटीला रामराम ठोकतील, 15 टक्के भाडेवाढीवरून प्रवाशांमध्ये संताप

एसटी गाडय़ांची कमतरता, कोलमडलेले वेळापत्रक आणि आगारांची दुरवस्था यामुळे गेल्या काही वर्षांत एसटीच्या प्रवाशांमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यात आता 25 जानेवारीपासून एसटीच्या भाडय़ात 15 टक्के वाढ करण्यात आली असून अशीच भाडेवाढ होत राहिली आणि प्रवाशांना उत्तम सोयीसुविधा मिळाल्या नाहीत तर उरले सुरले प्रवासीही एसटीला रामराम ठोकून खासगी बसेस, टॅक्सी आणि इतर वाहनांकडे वळतील, अशा शब्दांत एसटीच्या प्रवाशांनी भाडेवाढीविरोधात संताप व्यक्त केला आहे.

अनेक एसटी आगारांत स्वच्छता नाही, स्वच्छतागृहांची दुरवस्था आहे. त्यात सुधारणा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे मुंबईहून एसटीने साताऱ्याला निघालेल्या सूर्यकांत खरात यांनी सांगितले. भाडेवाढीनंतर त्यांना याआधी 300 ते 400 रुपये भाडे द्यावे लागत होते. यावेळी त्यांच्याकडून 500 रुपये प्रवास भाडे घेण्यात आले. साताऱ्यात अमरलक्ष्मी स्टॉप येथे उतरल्यानंतर पुढील प्रवासासाठी त्यांना 150 रुपये भाडे द्यावे लागते. म्हणजेच एकूण प्रवासासाठी त्यांना साडेसहाशे रुपये मोजावे लागणार आहेत, असे खरात यांनी सांगितले. तर दिव्यांगांसाठीही एसटीचा प्रवास महाग झाल्याचे राजापूर तालुक्यातील वरोळे गावचे रहिवासी संदीप सावंत म्हणाले. एसटी आगारांची दुरवस्था असून, विश्वासामुळे एसटीने प्रवास करतो; परंतु अशी भाडेवाढ होत राहिली तर आम्ही मुंबई ते कोकण प्रवास करायचा कसा, असा सवाल संदीप सावंत यांनी केला.

केवळ भाडेवाढ केली जात आहे, परंतु एसटीची अवस्था जैसे थे आहे, असे त्या म्हणाल्या. गावी पोहोचेपर्यंत पंबरडे अक्षरशः खिळखिळे होऊन जाते, त्या औषधपाण्याचा खर्चही सरकारने द्यावा अशी मागणी ठाण्याहून जुन्नरला जाणाऱ्या शैलेजा कर्पे यांनी नाराजी व्यक्त केली.

लाडक्या बहिणींकडून अशी वसुली

लाडक्या बहिणींच्या खात्यात एकीकडे पैसे टाकण्यात आले, तर आता दुसरीकडे अशाप्रकारे भाडेवाढ करून वसुली करण्यात येत आहे, असा संताप काही महिला प्रवाशांनी व्यक्त केला. महिलांना तिकिटात सवलत आहे. परंतु, भाडेवाढ झाल्याने गावी जाण्यासाठी यावेळी 520 रुपये मोजावे लागले. महिलांसाठी अर्धे तिकीट असले तरीही ही भाडेवाढ परवडणारी नाही, असे शोभा पालकर म्हणाल्या.

सुट्टय़ा पैशांमुळे वाहकांना नाहक भुर्दंड

भाडेवाढीनुसार पूर्ण तिकिटासाठी 11, 21 आणि 31 असे भाडे आकारले जात आहे. अर्ध्या तिकिटासाठी 6, 11, 16, 21 आणि 36 असे रुपये मोजावे लागत आहेत. परंतु, सुट्टय़ा पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये अनेक ठिकाणी वाद झाल्याचे समोर आले. उगाच वादविवाद नको म्हणून आम्ही गप्प बसतो. परंतु, वरचा रुपया सोडावा लागत असून नंतर वाहकांना त्यांच्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत. असे जळगावचे वाहतूक नियंत्रक आणि एसटी कामगार सेनेचे प्रसिद्धीप्रमुख गोपाळ पाटील यांनी सांगितले.