
रेल्वेतील जेवण निकृष्ट असल्याच्या अनेकदा तक्रारी येतात. 2024-25 या आर्थिक वर्षात तर अशा तब्बल 6645 तक्रारी आल्या. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे रेल्वेतील खानपान सेवेच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वेतील निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल किती तक्रारी आल्या, याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन ब्रिटास यांनी रेल्वेतील जेवणाचा दर्जा आणि कंत्राट वाटपातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावर रेल्वेमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले. प्राप्त झालेल्या एकूण 6645 तक्रारींवर विविध स्तरांवर कारवाई करण्यात आली आहे. या 1341 प्रकरणांमध्ये अन्न पुरवठादारांवर दंड ठोठावण्यात आला. 2023-24 या वर्षी 7026 तक्रारी आल्या होत्या. 2022-23 या वर्षात 4421 तक्रारी व 2021-22 या वर्षी 1082 तक्रारी नोंदवण्यात आल्या.
कारवाई काय झाली…
- 2995 प्रकरणांमध्ये संबंधित कंत्राटदारांना कडक शब्दांत ताकीद देण्यात आली. 547 प्रकरणांमध्ये दर्जा सुधारण्यासाठी योग्य सल्ला आणि सूचना देण्यात आल्या.
- भेसळयुक्त किंवा अस्वच्छ अन्नाची तक्रार आल्यास त्वरित दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच जेवणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालय अनेक उपाययोजना करत असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.