
नवी मुंबई विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वाराला जोडल्या जाणाऱ्या इस्टर्न एण्ट्री इंटरचेंज प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सहा महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतूककोंडीच्या कचाट्यातून प्रवाशांची सुटका होणार आहे. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, पामबीच तसेच अटल सेतूवरून येणाऱ्या मार्गांना हा इंटरचेंज प्रकल्प जोडला गेला आहे. त्यामुळे परदेशात जाणारे प्रवासी कटकटीविना नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ८०० कोटी रुपयांच्या निधीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पाचे काम करत आहे. ‘क्लोव्हर लीप’ इंटरचेंजमुळे पनवेल शहर, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर आणि जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रकल्पामध्ये फुलपाखराच्या आकाराचा विनासिग्नल उड्डाणपूल आणि जोडरस्त्यांचे मोठे जाळे तयार केले जात आहे. या उड्डाणपुलामुळे गाढी नदीवरील खाडीमार्ग ओलांडून कंटेनर थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वारापर्यंत विनाअडथळा पोहोचू शकतील अशी या मार्गाची रचना करण्यात आली आहे.
इस्टर्न इंटरचेंजच्या धर्तीवर विमानतळाच्या उलवा बाजूस वेस्टर्न एंट्री इंटरचेंज या प्रकल्पाचे कामही सुरू आहे. या इंटरचेंजमुळे अटल सेतूवरून मुंबईच्या दिशेने आलेल्या वाहनांना थेट विमानतळ गाठणे शक्य होणार आहे.
विकासाला चालना मिळणार
इंटरचेंज प्रकल्पामध्ये मोठमोठे उड्डाणपूल, गोलाकार चौक आणि उंच मार्गाच्या जाळ्यामुळे नवी मुंबई आणि पनवेल शहर कायम विमानतळाशी कनेक्ट राहणार आहे. यामुळे नवी मुंबईपाठोपाठ पनवेल शहर व परिसराचा झपाट्याने विकास होईल. या प्रकल्पामुळे पनवेल शहरातील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि अटल सेतू-पामबीच मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळापर्यंत थेट पोहोचता येणार आहे.


























































