पाथर्डी- नगर मार्गावर खडी वाहणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

खडी वाहणाऱ्या विनाक्रंमाकच्या चारचाकी वाहनाने गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीला धडक दिली. पाथर्डी नगर रोडवर असलेल्या हॉटेल प्रशांत समोर हा अपघात झाला. त्यात दुचाकीवर असणाऱ्या पतीचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. नितीन संजय पवार (वय 27, रा. वाघोली ता. शेवगाव) यांचा अपघातात मृत्यू झाला तर त्यांची पत्नी रेणुका पवार (वय 24) गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले आहे.

पाथर्डी नगर मार्गावरून दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पवार दांपत्य दुचाकीने जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात नितीन पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर रेणुका पवार या गंभीर जखमी झाल्या. या धडकेनंतर धडक दिलेले वाहनही रस्त्याच्या बाजूला उलटले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने घटनास्थळी गर्दी जमा झाली. ग्रामस्थांनी नितीन पवार व रेणुका पवार यांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तापसणी करून डॉक्टरांनी नितीन पवार यांना मृत घोषित केले. तर रेणुका यांना पुढील उपचारासाठी नगर येथे पाठवण्यात आले आहे.घटनेनंतर चारचाकी वाहनाचा चालक पसार झाला आहे.