डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना पाकिस्तानसोबत चर्चा ही फक्त पाकव्याप्त कश्मीर आणि दहशतवादावरच होईल असे सांगितले. तसेच हा संदेश त्यांनी जगाला देखील दिला. मात्र त्यांच्या या संबोधनाच्या काही मिनिटे आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा व्यापार आणि युद्धबंदीच्या वक्तव्याचा पुर्नरुच्चार केला. त्यावरून आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

हिंदुस्थान पाकिस्तान युद्धबंदीबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ”अमेरिकेसोबतच्या व्यापारासाठी हिंदुस्थान पाकिस्तानने युद्धबंदी केली” असे वक्तव्य केलं आहे. ”हिंदुस्थान आणि पाकिस्तानला युद्ध थांबवण्यासाठी आम्हीच सांगितले. आम्हाला दोन्ही देशांसोबत व्यापार करायचा आहे. पण जर युद्ध सुरू राहिले तर व्यापार होऊ शकत नाही असे आम्ही दोन्ही देशांना सांगताच त्यांनी युद्ध थांबवले. युद्ध थांबवण्यासाठी इतरही काही कारणं असतील पण व्यापार हे त्यातील महत्त्वाचे कारण आहे’, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

त्याविषयी बोलताना काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भाजप व मोदींवर टीका केली आहे. ”डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य अंत्यत त्रासदायक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही म्हटले आहे ते कोणत्याही देशवासियाला मान्य नसेल. आम्हाला हिंदुस्थान सरकारकडून यावर स्पष्टिकरण हवंय. व्यापारामुळे युद्ध थांबवले का? डोनाल्ड ट्रम्प यांना माहित नसेल की हिंदुस्थान सिंदूरचा व्यापार करत नाही. त्यामुळे आम्हाला जाणून घ्यायचे आहे की कोणत्या अटीशर्तींवर ही मध्यस्थी झाली आहे, असे पवन खेरा म्हणाले.