पेंटागॉनची खादाडी! खेकडे, लॉबस्टर डिनरवर 9 दशलक्ष डॉलर्सची उधळपट्टी, एकूण खर्च 93 अब्ज डॉलर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत महागाईमुळे सामान्य नागरिक वाढत्या खर्चाला सामोरे जात असताना, अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या म्हणजेच पेंटागाॅनच्या खर्चावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. ऑक्टोबर ते सप्टेंबर या आर्थिक वर्षात पेंटागॉनने विविध वस्तू आणि सेवांवर तब्बल 93 अब्ज डॉलर्स खर्च केल्याचे आता उघड झाले आहे. सरकारी खर्चावर लक्ष ठेवणाऱ्या ओपन द बुक्स या वॉचडॉग संस्थेने केलेल्या नव्या विश्लेषणात ही माहिती उघड झाली आहे.

अहवालानुसार, सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेचे रक्षामंत्री पीट हेगसेट यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण विभागाने डिनरमध्ये खेकडे आणि लॉबस्टर खाण्यासाठी तब्बल 9 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला आहे. लष्करी संस्कृतीत सर्फ अँड टर्फ म्हणजेच स्टेक आणि खेकडे हे जेवणात असतात. हे अशा पद्धतीचे जेवण मोठ्या लष्करी मोहिमा किंवा तैनातीपूर्वी दिले जाणारे विशेष जेवण मानले जाते.

हा खर्च अशा वेळी झाला जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत अमेरिकेने युद्धाची तयारी केली होती. विमानवाहू जहाजे, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्या होत्या. संरक्षण विभागात युज इट किंवा लूज इट हा नियम लागू असतो. म्हणजे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निधी खर्च न केल्यास पुढील वर्षी कमी बजेट मिळू शकते. त्यामुळे सप्टेंबरमध्ये खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. सप्टेंबरच्या शेवटच्या काही दिवसांतच संरक्षण विभागाने 50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम करार आणि अनुदानांवर खर्च केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या खर्चात अनेक आश्चर्यकारक गोष्टींचाही समावेश आहे. फर्निचरवर 225.6 दशलक्ष डॉलर्स तर, आयटी आणि दूरसंचार सेवांवर 5.9 अब्ज डॉलर्सचा खर्च झाला आहे. खर्चाच्या यादीत काही विचित्र बाबीही समोर आल्या आहेत. यात गायीच्या मांसावर तब्बल 15.1 दशलक्ष डॉलर्स, आईस्क्रीम मशीन 124,000 डॉलर्स, डोनट 139,224 डॉलर्स, सॅल्मन 1 दशलक्ष डॉलर्स असे अनेक पदार्थांवर काही कोट्यावधींचा खर्च झाला आहे. तंत्रज्ञान उपकरणांवरही मोठा खर्च यावेळी करण्यात आला आहे. Apple डिव्हाइसेसवर 5.3 दशलक्ष डॉलर्स, 400 iPad Air M3 तसेच विविध सॅमसंगच्या उत्पादनांवर 4 दशलक्ष डॉलर्सचा खर्च केला आहे. मनोरंजनासाठी संरक्षण विभागाने 1.8 दशलक्ष डॉलर्स किमतीची संगीत वाद्ये खरेदी केली. यात 98,000 डॉलर्सचा ग्रँड पियानो, 26,000 डॉलर्सचा व्हायोलिन आणि 21,750 डॉलर्सची जपानी बासरी देखील आहे.

अमेरिकेत महागाईमुळे सामान्य लोक त्रस्त असताना सरकारी निधी अशा प्रकारे खर्च केला जात असल्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सरकारी खर्चातील पारदर्शकता आणि जबाबदारीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.