टॅरिफला विरोध करणारे मूर्ख! प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या खात्यात 2000 डॉलर टाकणार, ट्रम्प यांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ‘अमेरिकन फर्स्ट’ धोरण राबवण्यास सुरुवात केली. त्यांनी एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला. मध्यंतरी त्यांनी जगभरातील देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली. याला उद्योजक एलन मस्क यांच्यासह अनेक अमेरिकन नेत्यांनी विरोध केला. यामुळे ट्रम्प आणि मस्कमध्ये वितुष्टही निर्माण झाले. मात्र टॅरिफमुळे अमेरिका अरबो रुपयांची कमाई करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

टॅरिफला विरोध करणारे मूर्ख असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी श्रीमंतांना सोडून प्रत्येक अमेरिकन नागरिकांना मालामाल करण्याची घोषणा केली. अमेरिकेला टॅरिफमधून मिळणाऱ्या महसुलातून प्रत्येक अमेरिकन नागरिकाला 2 हजार डॉलर देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ अकाऊंटवरून एक पोस्ट करत त्यांच्या व्यापार धोरणावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. जे लोक टॅरिफला विरोध करत आहे ते मूर्ख आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच त्यांच्या सरकारने अमेरिकेला जगातील सर्वात श्रीमंत आणि आदरणीय देश बनवला आहे. महागाईचा मागमूसही नसून शेअर बाजारही विक्रमी स्तरावर पोहोचला आहे, असा दावाही त्यांनी केला.

टॅरिफमुळे अमेरिकेला ट्रिलियन डॉलर्स मिळत असून या पैशाचा उपयोग देशावरील 37 ट्रिलियन डॉलरचे कर्ज फेडण्यासाठी केला जाईल. प्रशासन लवकरच कर्ज फेडण्यास सुरुवात करेल आणि त्याचवेळी उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना वगळून प्रत्येक अमेरिकन नागरिकांना किमान 2 हजार डॉलर लाभांश देण्यात येईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले. अर्थात ट्रम्प यांनी हा लाभांश कसा वितरित केला जाईल किंवा तो कधीपासून दिला जाईल, त्यासाठी किती उत्पन्न हवे याबाबत कोणताही तपशील दिलेला नाही.

याआधी अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी ऑगस्टमध्ये माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट टॅरिफमधून मिळणाऱ्या महसुलाचा वापर करून देशावरील 38.12 ट्रिलियन डॉलरचे कर्ज फेडण्यावर आहे. मात्र आता ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेबाबत त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली असून यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले. ही रक्कम कराच्या रुपात दिली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.