Video – रसगुल्ले संपल्याची अफवा पसरली, वधू आणि वर पक्षात तुफान हाणामारी

रसगुल्ल्याची निर्मिती सगळ्यात पहिले पश्चिम बंगालमध्ये झाली आणि हा बंगाली गोड पदार्थ आहे असा सगळ्यांचा समज आहे. मात्र ओडिशा सरकारने रसगुल्ला हा बंगाली गोड पदार्थ नसून तो ओडिशाचा गोड पदार्थ असल्याचे म्हटले होते. रसगुल्ला कोणाचा यावरून दोन राज्यात बराच वैचारीक संघर्ष झाला आहे.

पश्चिम बंगालमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ‘कोलंबस ऑफ रसगुल्ला’ नावाने प्रसिद्ध नोबिन चंद्रा यांनी सगळ्यात पहिल्यांदा रसगुल्ला बनवला होता. 1868 साली त्यांनी रसगुल्ला बनवल्याचा दावा त्यांचे वंशज करतात. हा इतिहास सांगण्याचे तात्पर्य म्हणजे रसगुल्ला हा बराच प्रसिद्ध असून त्यासाठी दोन राज्ये भांडत आहेत. एकीकडे रसगुल्ला कोणाचा हा वाद सुरू असताना प्रत्यक्ष पंगतींमध्येही रसगुल्ल्यावरून वाद सुरू असून रसगुल्ल्यासाठी लोकं एकमेकांची डोकी फोडायलाही पाठीपुढे पाहात नाहीत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एक लग्न सुरू होतं. सगळी मंडळी खुशीत असताना अचानक कुठून तरी बातमी आली की जेवणातील रसगुल्ले संपले आहेत. अवघ्या काही सेकंदात त्या लग्नमंडपातील आनंदाचे वातावरण संतापाने पेटलेले झाले. वर आणि वधू पक्षाच्या लोकांनी एकमेकांना जाब विचारायला सुरुवात केली, शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोन्ही पक्षाच्या लोकांनी हाणामारी करत वादाचा फैसला लावण्याचा निर्धार केला. काही क्षणातच लग्न मंडपातील वातावरण डब्ल्यू.डब्ल्यू.एफच्या रॉयल रंबलच्या आखाड्याप्रमाणे बनले. ज्याला जो समोर दिसेल त्याने त्याला मारायला सुरुवात केली. हातात जी गोष्ट लागेल ती गोष्ट घेऊन ही हाणामारी सुरू होती. काहींनी खुर्च्या फेकून मारल्या तर काहींनी भांडी फेकून मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सासनीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुजपुरा येथील आशु गार्डन हॉलमध्ये घडले आहे. पोलिसांकडे प्रकरण पोहोचल्यानंतर त्यांनी याचा तपास केला. पोलिसांना कळाले की वादाची सुरुवात वधूच्या घरातील एका वादामुळे झाली होती. त्यात वर पक्षाच्या काहींनी नाक खुपसल्याने वाद वाढला आणि नंतर तो पेटला. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या लोकांशी बोलून वाद मिटवला असून आता सगळं प्रकरण शांत झाल्याचे त्यांनी सांगितले.