
घरांच्या किमती कमी केल्याचे म्हाडाच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मूळ किमतीत घर खरेदी करणाऱयांनी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आमच्याकडून घेतलेली जादा रक्कम 18 टक्के व्याजाने परत करण्याचे आदेश न्यायालयाने म्हाडाला द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
महेश शेटये यांच्यासह 27 जणांनी अॅड. दीनदयाळ धनुरे यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. घराच्या किमती कमी केल्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने द्यावेत, असेदेखील याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्यासाठी म्हाडाच्या वकील सायली आपटे यांनी वेळ मागितला. ते मान्य करत न्यायालयाने ही सुनावणी आठ आठवडय़ांसाठी तहकूब केली.
एकाच इमारतीतील घरांच्या किमतीत फरक
शेटये यांच्यासह 27 जण प्रभादेवी येथील स्वगृह को-ऑप. हौ. सोसायटीत राहतात. त्यांना जुलै 2023 मधील म्हाडाच्या लॉटरीत येथे घर मिळाले. सप्टेंबर 2024 मध्ये येथील इमारतीतील घरांसाठी काढलेल्या लॉटरीत म्हाडाने घराच्या किंमती कमी केल्या. हे नैसर्गिक न्यायदानाच्या विरोधात आहे. नवीन लॉटरीत 10 ते 25 टक्क्यांनी घरांच्या किमती कमी करण्यात आल्या. आम्ही कर्ज काढून घर घेतले आहे. एका वर्षातच घराच्या किमती कमी केल्या असतील तर आम्हालाही त्याचा लाभ द्यावा. आमच्याकडून घेतलेले जादा पैसे म्हाडाने परत करावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
नऊ कोटी परत करावे लागतील
या 27 याचिकाकर्त्यांनी स्वगृह सोसायटीत एमआयजी व एचआयजीची घरे 2023 मध्ये घेतली आहेत. 2024 च्या दरानुसार या सर्वांकडून घेतलेली वाढीव रक्कम परत करायची झाल्यास म्हाडाला एकूण 9 कोटी 34 लाख रुपये द्यावे लागतील.
30 लाख कमी केले
स्वगृह सोसायटीतील घराची किंमत 2023 च्या लॉटरीत 1 कोटी 62 लाख रुपये होती. 2024 लॉटरीत 1 कोटी 30 लाख रुपये करण्यात आली. सर्वसामान्यपणे घराच्या किमती वाढत असतात. म्हाडाने घराच्या किमती कमी केल्या आहेत. यातील फरकाची रक्कम आम्हाला परत करा, अशी विनंती म्हाडाला वारंवार करण्यात आली. म्हाडाने याचे काहीच उत्तर दिले नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.