सिडकोच्या घरांचे दर कमी करा, हायकोर्टात याचिका

सिडकोने नवी मुंबईत सर्वसामान्य नागरिकांसाठी घरे बांधली आहेत. मात्र या घरांच्या किमती परवडणाऱया नाहीत. सिडकोने सर्वसामान्यांची दिशाभूल केली असून या घरांच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी करत नवी मुंबईतील 28 रहिवाशांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

सिडकोने ‘माझे पसंतीचे घर’ ही योजना राबवली. या योजनेअंतर्गत सिडकोने वाशी, खारघर, द्रोणागिरी, तळोजा या ठिकाणी अल्प उत्पन्न गट आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही घरे बांधली आहेत. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ही घरे परवडणारी असताना वाशी ट्रक टर्मिनलसारख्या ठिकाणी 322 चौरस फूट घरांच्या किमती 74.64 लाखांपर्यंत निश्चित केल्या आहेत. या घराच्या किमती अवाजवी असून न परवडणाऱया आहेत. त्यामुळे संविधानाच्या कलम 14 आणि कलम 21 चे उल्लंघन होत असल्याचा दावा करत रहिवाशांनी अॅड. विनोद सांगवीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

27 जानेवारीला सुनावणी

सिडकोने घराचे चटईक्षेत्र आणि किमतीबाबत स्पष्टीकरण द्यावे तसेच किमतीत सुधारणा कराव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे. यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर 27 जानेवारीला सुनावणी होणार आहे.