
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्ये प्रकरणी काँग्रेसने आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडक दिली. नरीमन पॉइंट आणि मरीन ड्राइव्ह येथेही रास्ता रोको आंदोलन करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. संपदा मुंडे यांचा जीव घेणाऱयांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. काँग्रेस नेते सचिन सावंत, युवक काँग्रेस अध्यक्षा झिनत शबरीन यांच्यासह शेकडो आंदोलकांना पोलिसांनी या वेळी अटक केली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि मुंबई युवक काँग्रेसने हे आंदोलन केले. गिरगाव चौपाटी येथे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारने पोलिसांच्या मदतीने प्रयत्न केला. गिरगाव चौपाटी भागातही ठिकठिकाणी अडथळे उभे करून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मरीन ड्राइव्ह येथे ट्रायडंट हॉटेलसमोर रास्ता रोको केला. त्यामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना गुंगारा देत वर्षा बंगला गाठला आणि बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ाा आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदन भानू चिब, प्रभारी मनीष शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा, वरिष्ठ प्रवत्ते सचिन सावंत यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.





























































