
कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वांची दैना उडत असल्याचे चित्र आहे. काहीकाळ पावसाच्या विश्रांतीमुळे काहीसा दिलासा मिळत असला, तरी अवघ्या अर्धा-पाऊण तासात मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील लहान-मोठी व मध्यम धरण प्रकल्प अजून अर्धे असतानाही पुढील पावसाचे प्रमाण आणि पुराच्या पार्श्र्वभूमीवर आतापासूनच सिंचन पाटबंधारे विभागाकडून धरणांतील साठलेल्या पाण्याचा टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येऊ लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राधानगरी धरणातून १ हजार ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला होता. आज सायंकाळी आणखी एक हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आल्याने, सध्या राधानगरी धरणातून एकूण २ हजार ५०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कुंभी मध्यम प्रकल्पाच्या विद्युतगृहामधून आज सकाळपासून ३०० क्युसेक विसर्ग पाणी सोडण्यात आले. तर, तुळशी ३००, दूधगंगा (काळम्मावाडी) १ हजार १००, कासारी – २५०, जंगमहट्टी ५०, घटप्रभा -४०० आणि धामणीमधून ३६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांतील सध्याचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि कंसात टक्केवारी : राधानगरी ४.३३ (५१.८४ टक्के), तुळशी – १.८३ (५२.६१), वारणा १४.०३ (४०.७९), दूधगंगा – ५.४६ (२१.४९), कासारी -०.८५ (३०.८८), कडवी – १.०९ (४३.२९), कुंभी – १.३१ (४८.३६), पाटगाव – १.६८ (४५.२०), चिकोत्रा ०.७६ (५०.१९), चित्री ०.६१ (३२.५२), जंगमहट्टी – ०.४७(३८.५३), घटप्रभा १.०४ (६६.९), जांबरे – ०.४२ (५१.४), आंबेआहोळ – ०.८८ (७०.९८), सर्फनाला ०.१९ (२८.४७) आणि धामणी – ०.१० (७.६५) इतका पाणीसाठा आहे.




























































