
काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस परतला आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईसह सर्वदूर महाराष्ट्रात पावसाच्या जोरधारा कोसळत आहेत. कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देशासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिह्यांना पावसाने झोडपले. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतात गाळ साचला, पिकांची नासाडी झाली. नदीनाले फुगले. बळीराजाच्या डोळय़ात पाणी आले. मंगळवारीही अशीच परिस्थिती राहणार आहे. पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा प्रशासनाने दिला.
कळव्यात विद्यार्थ्यांची बोटीतून सुटका
ठाण्यात मुसळधार पावसाने सर्वाची दाणादाण उडाली, त्यातच कळवा पूर्व या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने शाळेत अडकलेल्या विद्यार्थ्यांची चक्क बोटीतून सुटका करण्यात आली. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना अनेक अडचणी येत होत्या. शाळेच्या परिसरातील कोळी बांधवांनी तत्काळ लहान बोटी काढल्या आणि मुलांची सुखरूप सुटका केली. जवळपास तासभर मदतकार्य सुरू होते. पालिका प्रशासनाला संपर्प करूनही कोणताही मदत मिळाली नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.
आंबा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गवरील आंबा घाटातील दख्खन जवळ आज सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूनी पाच यंत्राच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. गेले चार पाच दिवस पावसाने रुद्ररूप धारण केल्यामुळे त्यातच महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कटाई करण्यात आलेल्या डोंगरामुळे राहिलेल्या डोंगराचा भाग सतत कोसळत असल्याने वाहतूकदार धास्तावले आहेत. त्यातच वाहतूक कोंडी होत आहे. सततच्या पावसामुळे दरड बाजूला हटविण्यास अडथळा येत आहे. तहसीदार व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
खेड शहराला पुराचा गंभीर धोका
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. खेड शहरालगतची जगबुडी नदी सतत वाढत्या पाण्यामुळे धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. नदीची इशारा पातळी 5 मीटर असून धोका पातळी 7 मीटर आहे. सध्या नदीचे पाणी 7.20 मीटरवरून वाहत असल्याने खेड शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. जगबुडी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून खेडमधील मटण-मच्छी मार्केट परिसर आणि शेजारील रस्त्यांमध्ये शिरले आहे. यामुळे व्यापारी व नागरिकांना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दापोली नाका येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.