
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी रविवारी डोळ्यांचे पारणे फेडणारा आनंद सोहळा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून असंख्य शिवसैनिकांची ‘मातोश्री’वर रीघ लागली. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी आबालवृद्धांनी भल्या पहाटेपासूनच रांगा लावल्या. झेंडूच्या फुलांनी केलेली आकर्षक सजावट, जागोजागी रेखाटलेली रांगोळी, विद्युत रोषणाई यामुळे ‘मातोश्री’वर उत्सवी वातावरण होते. ‘वाढदिवसाच्या हर्षाला, आम्ही येऊ दरवर्षाला’, ‘उद्धवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. निष्ठेचा सागरच यानिमित्ताने उसळला.
मी आपणापुढे नतमस्तक! उद्धव ठाकरे यांनी मानले आभार
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱयांसमोर आपण मनापासून नतमस्तक होतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीसमोर उद्धव ठाकरे यांच्यासोबत काढलेला पह्टो ट्विट केला आणि ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या’ असे त्यात नमूद केले. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘अनेक वर्षांनी आम्ही दोघे भाऊ भेटलो त्यात काय अयोग्य आहे. आम्ही दोघे जिथे वाढलो तिथे भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवले त्या शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत जाऊन नतमस्तक झालो. त्यात चर्चेसारखे काहीही नाही.
उद्धव ठाकरे यांनी केले राज यांचे स्वागत
राज ठाकरे ‘मातोश्री’वर येणार याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या पह्नवरून त्यांनी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांना पह्न करून आपण ‘मातोश्री’वर येत असल्याचे सांगितले. संजय राऊत यांनी तो निरोप उद्धव ठाकरे यांना दिला. राज ठाकरे सकाळी साडेअकरा वाजता शिवतीर्थ निवासस्थानाहून मातोश्रीकडे निघाले. दुपारी बारा वाजता ते मातोश्रीवर पोहोचले. राज ठाकरे आल्याचे समजताच उद्धव ठाकरे स्वतः त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेर आले. यावेळी संजय राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, वैभव नाईक उपस्थित होते.
कुटुंबीयांसोबत केक कापला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री 12 वाजता कुटुंबीयांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आसन असलेल्या खोलीमध्ये काwटुंबिक वातावरणात हा सोहळा झाला. यावेळी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा दिल्या.
महापालिका जिंकायचीच, शिवसैनिकांचा निर्धार
उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी शिवसैनिकांनी आकर्षक स्वरूपातील छायाचित्रे भेट दिली. यामध्ये मुंबई महापालिका आणि सोबत उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असलेली प्रतिमा तसेच धगधगत्या मशालीची भव्य प्रतिकृती उपस्थित शिवसैनिकांचा उत्साह वाढवणारी ठरली. भेटवस्तू म्हणून ती प्रतिमा उद्धव ठाकरे यांच्या हाती सुपूर्द करताच सर्वांनी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘महापालिका जिंकायचीच’ असा जयघोष केला.
अनेक शिवसैनिक आदल्या रात्री मुक्कामी
अनेक शिवसैनिकांनी काल रात्रीच वांद्रे परिसर गाठत मुक्काम केला. यात परभणीचे माऊली दुधाटे, मोहोळचे ज्ञानेश्वर पाटील यांचा समावेश होता. वाढदिवशी उद्धवसाहेबांची पहिली भेट मिळावी, यासाठी मी कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. यंदा माझे ते स्वप्न पूर्ण झाले आणि माझ्या आनंदापुढे आभाळ ठेंगणे झाले, अशी भावना माऊली दुधाटे यांनी व्यक्त केली.
मुस्लिम मावळा कुटुंबीयांसोबत हजर
उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व धर्मातील बांधवांनी हजेरी लावली होती. अहिल्यानगर येथील मुस्लिम मावळा अजिज मोमीन कुटुंबीयांसोबत हजर राहिला होता. मोमीन कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी मोमीन यांच्या मुलीला प्रेमाने आशीर्वाद दिला.
दृष्टी परिवारही पोहचला
उद्धव ठाकरे यांच्यावर समाजातील प्रत्येक घटकाचे प्रेम असल्याचा प्रत्यय वाढदिवस सोहळय़ात आला. असंख्य शिवसैनिकांसह अंध, दिव्यांग व्यक्तींनीही हजेरी लावली. साकीनाका येथील दृष्टी परिवारातील 11 अंध व्यक्तींचा ग्रुप सकाळीच दाखल झाला. ते शिवसेनाप्रमुखांच्या आसनापुढे नतमस्तक झाले आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रांगेत उभे राहिले. मागील 11 वर्षांपासून आम्ही ‘मातोश्री’वर येत आहोत. आम्ही 100 टक्के नेत्रहीन आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांना पाहता येत नाही. मात्र त्यांचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांच्या सहवासात काही क्षण घालवण्यासाठी येतो, असे अंध व्यक्तींच्या समूहातील आण्णा पुंभार म्हणाले. दृष्टी परिवाराचे अध्यक्ष ज्ञानेश जोशी हेही उपस्थित होते.
महाराष्ट्र आज आनंदी आहे!
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘मातोश्री’ येथे जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरही ते बोलले. महाराष्ट्र आज आनंदी आहे, अशी पोस्ट ‘एक्स’वर संजय राऊत यांनी केली. ठाकरे बंधूंमधील नाते दृढ होत आहे याबद्दल आम्हाला आनंद आहे, असे संजय राऊत म्हणाले. ठाकरे बंधूंच्या भेटीमध्ये राजकीय युतीबद्दल काही चर्चा झाली का, असे माध्यमांनी विचारले असता जे होईल ते चांगलेच होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
नेते, पदाधिकाऱयांची मांदियाळी
शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
शिवसेना नेते अनिल देसाई यांनी अभीष्टचिंतन केले.
आमदार सुनील राऊत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
‘मातोश्री’वर असंख्य शिवसैनिकांबरोबर नेत्यांनी हजेरी लावली आणि उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, अनिल परब, सुनील प्रभू, राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार वरुण सरदेसाई, आदेश बांदेकर, सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे, सुधीर साळवी, आमदार अजय चौधरी, संजय पोतनीस, पैलास पाटील, ज. मो. अभ्यंकर, महेश सावंत, बाळा नर, मनोज जामसुतकर, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, नितीन नांदगावकर, तेजस्विनी घोसाळकर, आनंद दुबे, माजी आमदार वैभव नाईक, विलास पोतनीस, रमेश कोरगावकर, दगडू सकपाळ, माजी महापौर श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, गुरुनाथ खोत, सुभाष भोईर शैलेश परब, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई आदींचा समावेश होता.
रक्ताने लिहिले शुभेच्छा पत्र
बुलढाणा जिह्यातील खामगाव तालुक्यातून आलेल्या श्रीराम खेलदार या शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. खेलदार यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले. ठाकरे परिवाराने मुंबई व महाराष्ट्राशी जिवाभावाचे नाते जपले आहे. महाराष्ट्रद्वेष्टय़ांनी शिवसेना पह्डून मुंबई काबीज करण्याचे कारस्थान रचले आहे. हा डाव उलथवून लावा, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार, असे वचन खेलदार यांनी पत्रातून दिले.
‘थिरू’ उद्धव ठाकरे! देशभरातून कौतुक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्रभरात मोठय़ा उत्साहात साजरा झाला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले. उद्धव ठाकरे हे मराठी भाषेसाठी देत असलेल्या लढय़ाचे, त्यांच्या खंबीर आणि संयमी नेतृत्वाचे नेत्यांनी भरभरून कौतुक केले. तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी ‘थिरू’ उद्धव ठाकरे… असे म्हणत वाढदिवसाच्या सदिच्छा व्यक्त केल्या.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही शुभेच्छा देताना, महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहू, अशी भावना व्यक्त केली. ‘काळ कसोटीचा असला तरी वारसा संघर्षाचा आहे. परिस्थिती गंभीर असली तरी नेतृत्व खंबीर आहे. आक्रमक बाळासाहेबांचे संयमी वारसदार माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा, अशी पोस्ट राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केली. द्वेष, स्वार्थ व कपटी राजकारणाच्या काळात नीतिमत्ता जपणारे महाराष्ट्राचे संवेदनशील आणि सुसंस्कृत नेतृत्व उद्धवजी ठाकरे यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, सुरेश म्हात्रे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार वर्षा गायकवाड, एकनाथ खडसे, नसीम खान, सतेज पाटील, राजेश टोपे, मनसेचे नेते राजू पाटील, धीरज देशमुख यांनीही अभीष्टचिंतन केले.
मराठीच्या रक्षणासाठी बळ मिळो!
स्टॅलिन यांनी ‘एक्स’वर खास पोस्ट केली. ‘मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या लढय़ाचे स्टॅलिन यांनी तोंडभरून कौतुक केले. ‘हिंदीसक्तीला प्रतिकार करण्याचे तुम्ही दाखवलेले धाडस आणि महाराष्ट्राची भाषिक ओळख जपण्याच्या तुमच्या ठाम भूमिकेमुळे मराठी माणूस पुन्हा एकवटला. हिंदुस्थानी संघराज्याच्या रक्षणासाठी व मातृभाषेचा सन्मान राखण्यासाठी तुम्हाला आणखी बळ लाभो,’ अशी सदिच्छा स्टॅलिन यांनी व्यक्त केली.
दादर येथील शिवसेना शाखा क्रमांक
191 चे शाखाप्र्रमुख अजित कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त प्रतीकात्मक शिवप्रताप वाघनखे भेट दिली.
शिवसैनिकांनी मातोश्री परिसरात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. डय़ुटीवरील पोलिसांचेही पेढे देऊन तोंड गोड केले.
‘मातोश्री’च्या प्रांगणात झेंडूच्या फुलांनी आकर्षक पद्धतीने सजावट केली होती. निवासस्थानाच्या मुख्य दरवाजाच्या दर्शनी भागात फुलांपासून बनवलेला ‘जय महाराष्ट्र’ तसेच गेटबाहेर फुलांमधून दिलेल्या ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ लक्षवेधी ठरल्या. या फुलांमुळे परिसरात प्रसन्न वातावरण होते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आसनदेखील चाफ्याच्या फुलांनी सजवण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांच्या आसनापुढे नतमस्तक होण्यासाठीही गर्दी केली.