पिंपरी महापालिकेचा शुक्रवारी अर्थसंकल्प, प्रशासक सादर करणार तिसरा अर्थसंकल्प

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (21 रोजी) प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत. महापालिकेचा 43वा अर्थसंकल्प असून, सलग तिसऱ्या वर्षी प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात शहरवासीयांसाठी कोणत्या योजना, प्रकल्प असणार, याची उत्सुकता लागली आहे.

महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाकडून 2025-26चा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विविध कामे, तरतुदींबाबत विभागनिहाय अधिकाऱ्यांच्य बैठका सुरू आहेत. सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन अर्थसंकल्पाला अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. यंदाचे ‘ई-बजेट’ असणार आहे.

गेल्या पाच वर्षांतील महापालिकेच्या अर्थसंकल्पाची आकडेवारी
सन 2020-21   6,627 कोटी
सन 2021-22   7,139 कोटी
सन 2022-23   6,497 कोटी
सन 2023-24   7,127 कोटी
सन 2024-25   8,676 कोटी

‘क्लायमेट बजेट’चा समावेश

■ वातावरणातील बदलामुळे नागरिक, तसेच प्राणी-पक्षी व निसर्गावर विपरीत परिणाम होत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सन 2025-26च्या अर्थसंकल्पात ‘क्लायमेट बजेट’चा (हवामान अर्थसंकल्प) समावेश केला जाणार आहे. शहराची हवा स्वच्छ राहण्यासाठी त्यासाठी विविध कामांचा समावेश असणार आहे.

विकास प्रकल्पांचा असणार तपशील

■ अर्थसंकल्पात केंद्र शासनाच्या पुरस्कृत विविध योजना, प्रशासकीय सुविधा, विविध विकासकामे, भूमिपूजन, आरोग्य, स्थापत्यविषयक कामे, शहरातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा, तसेच विविध विकासकामांसाठी अत्यावश्यक निधी, तरतुदी, महसूल आदी बाबींचा तपशील देण्यात येणार आहे.